गावगुंडांचा पोलीस पथकावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 01:53 AM2019-06-11T01:53:28+5:302019-06-11T01:53:52+5:30
नवीन सीबीएस बसस्थानकाच्या आवारात रविवारी (दि.९) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास डझनभर गावगुंडांच्या टोळक्याने अंडाभुर्जी विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला दमबाजी करत त्याच्या वाहनाची तोडफोड केली. यावेळी घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांच्या पथकावरही टोळक्याने लाकडी दंडुके, लोखंडी फावड्यांनी हल्ला चढवून एका पोलिसाला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
नाशिक : नवीन सीबीएस बसस्थानकाच्या आवारात रविवारी (दि.९) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास डझनभर गावगुंडांच्या टोळक्याने अंडाभुर्जी विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला दमबाजी करत त्याच्या वाहनाची तोडफोड केली. यावेळी घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांच्या पथकावरही टोळक्याने लाकडी दंडुके, लोखंडी फावड्यांनी हल्ला चढवून एका पोलिसाला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन दिवसांपूर्वी उपनगर पोलिसांच्या हद्दीत नारायणबापूनगर परिसरात टोळक्याने मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालून सात वाहनांची तोडफोड केल्याचे समोर आले होते.
शहरात गावगुंडांचा वाढता उपद्रव पोलिसांना केवळ आव्हान देणारा ठरत नसून त्यांच्या जिवावर बेतणाराही ठरत असल्याचे रविवारच्या घटनेनंतर समोर आले. नव्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरात रात्री अंडाभुर्जी विक्री करणाºया अॅपेरिक्षावर दहा ते बारा संशयित हल्लेखोरांच्या टोळक्याने दमबाजी करत रिक्षाची तोडफोड करून नुकसान केले. या घटनेची माहिती सरकारवाडा पोलिसांना मिळताच रात्रगस्तीवर असलेल्या गुन्हे शोध पथकाच्या उपनिरीक्षक योगीता नारखेडे यांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
हल्लेखोरांना पोलीस कोठडी
शाहीर असाराम जावळे (२०), सोनू सुभाष कांबळे (२०), नितीन धुराजी हिवाळे (१९), सौरभ पाराजी पाथरे (२०), भीमा रामभाऊ पाथरे (२०), सुरज तुळशीराम लहाडे (२१), योगेश धुराजी हिवाळे (२३), अमोल पांडुरंग कोळे (२३), श्याम मच्छिंद्र चव्हाण (२१) यांच्यासह चार अल्पवयीन मुलांनाही (सर्व रा.भीमवाडी, गंजमाळ) अटक केली आहे. यापैकी संशयित शाहीर याने पोलीस सागर हजारी यांच्या डोक्यात लोखंडी फावडा मारल्याचे फिर्यादित म्हटले आहे. संशयितांना जिल्हा व सत्र न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने येत्या गुरुवारपर्यंत (दि.१३) पोलीस कोठडी सुनावली.
गुन्हेगारांची वाढली मजल
नाशिक शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून वाढत्या गुन्हेगारीने नागरिक त्रस्त झाले आहे. पोलिसांवर हल्ला करण्यापर्यंत गावगुंडांची मजल वाढल्याने संताप व्यक्त होत आहे. टोळक्याने पोलिसांवर चाल करत लाकडी दंडुक्याने जखमी करणे ही गंभीर बाब आहे. याप्रकरणी १३ संशयितांच्या टोळक्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात पोलीस प्रशांत रामदास मरकड यांच्या फिर्यादीवरून प्राणघातक हल्ला, दंगल माजविणे, शस्त्रबंदी कायद्याचे उल्लंघन करणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सर्व संशयितांना पोलिसांनी रात्रीतून अटक केली आहे. यामध्ये काही अल्पवयीन असून, काही सराईत गुन्हेगार आहेत. सर्व गंजमाळ परिसरातील भीमवाडी झोपडपट्टी भागातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.