नखे मिळविण्यासाठी ऊसतोड मजुराने नाशिकमध्ये मृत बिबट्याचा कापला पंजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 03:27 PM2018-03-12T15:27:02+5:302018-03-12T15:27:02+5:30
यावेळी सहा महिन्यांचा नर जातीचा बिबट्याचा बछडा कामगारांना मृतावस्थेत मिळून आला. कामगारांनी ही बाब शेतमालकाच्या लक्षात आणून दिली.
नाशिक : इगतपुरी वनपरिक्षेत्राच्या हद्दीमधील शेणीत या गावाच्या शिवारातील एका ऊसशेतीमध्ये सहा महिन्याचा बछडा मृतावस्थेत आढळला असता वनविभागाच्या अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी उजव्या पायाचा पंजा कापलेला असल्याचे निदर्शनास आले. ऊसतोड कामगारांच्या टोळीतील एका मजूराला वन अधिकाºयांनी संशयावरुन ताब्यात घेतले. नखांसांठी पंजा कापल्याची कबुली त्याने चार दिवसांच्या वन कोठडीत दिली आहे.
याबाबत वनविभागाच्या सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, सिन्नर-घोटी रस्त्यावर असलेल्या शेणीत गावाच्या शिवारात एका ऊसशेतीमध्ये ऊसतोड सुरू होती. यावेळी सहा महिन्यांचा नर जातीचा बिबट्याचा बछडा कामगारांना मृतावस्थेत मिळून आला. कामगारांनी ही बाब शेतमालकाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर पोलीस पाटील यांना ही घटना शेतक-यांनी कळविली. पोलीस पाटील यांनी घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांना दिली. माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृत बिबट्याच्या बछड्याची पाहणी करत त्यांनी पंचनामा सुरू केला. यावेळी बिबट्याच्या उजव्या पायाचा एक पंजा काही वेळेपुर्वीच कापल्याचे आढळून आले. यासाठी कोयत्याचा वापर केल्याचे त्यांच्या लक्षात आले. वनअधिकारी-कर्मचाºयांना बघून काही ऊसतोड कामगारांच्या वर्तणुक बदलल्याने संशयावरुन कर्मचा-यांनी एका कामगाराला ताब्यात घेतले. यावेळी त्याला वनहिसका दाखविल्यानंतर संशयित संशयित कारभारी बाबुराव पवार (२१, रा.वैजापुर) याने गुन्ह्याची कबुली दिली. दोन दिवसांपासून बछडा मृतावस्थेत पडून होता व त्यामुळे मला नखांचा मोह झाला आणि त्यासाठी पंजा कापल्याची कबुली पवार याने दिल्याची माहिती ढोमसे यांनी दिली. दरम्यान, वन्यजीव कायद्यानुसार संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची वनकोठडी सुनावली. वनविभागाच्या अधिका-यांनी घटनास्थळावरून कोयता, मुद्देमाल हस्तगत केला आहे. पुढील तपास ढोमसे करीत आहेत.
नैसर्गिक मृत्यू शवविच्छेदनातून स्पष्ट
बिबट्याचा बछड्याचा मृत्यू शिकारीच्या माध्यमातून नव्हे तर नैसर्गिकरित्या झाला असल्याचे पशुवैद्यकिय अधिकाºयांनी केलेल्या शवविच्छेदनाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. बिबट्याचा बछडा दोन दिवसांपासून मृत झाला असून त्याला न्युमोनिया व उष्माघाताचा फटका बसल्याचे शवविच्छेदन करणाºया वैद्यकिय अधिका-यांनी म्हटले आहे, अशी माहिती वनविभागाच्या सुत्रांनी दिली आहे.
---