घोटी बसस्थानक बनले समस्यांचे आगार; प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:17 AM2021-09-12T04:17:12+5:302021-09-12T04:17:12+5:30

पुरुषोत्तम राठोड लोकमत न्यूज नेटवर्क घोटी : इगतपुरी तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या घोटी बसस्थानकाला विविध समस्यांनी ग्रासले असून कुठल्याही ...

Ghoti bus stand became a hotbed of problems; Passenger safety in the air | घोटी बसस्थानक बनले समस्यांचे आगार; प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर

घोटी बसस्थानक बनले समस्यांचे आगार; प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर

Next

पुरुषोत्तम राठोड

लोकमत न्यूज नेटवर्क

घोटी : इगतपुरी तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या घोटी बसस्थानकाला विविध समस्यांनी ग्रासले असून कुठल्याही प्रकारची सुविधा या ठिकाणी नसल्याने प्रवाशांची कुचंबणा होत आहे. आदिवासी भागातून घोटी शहर बसस्थानकात दररोज हजारो प्रवाशांची ये-जा सुरू असते. त्यांना अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात परिवहन प्रशासन असक्षम ठरले असून सुविधांची वानवा असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन सुस्त असल्याचे निदर्शनास येत आहे.

तालुक्यातील मुख्य आगार इगतपुरी असले तरीही घोटी शहरातील बसस्थानक मध्यवर्ती असल्याने या ठिकाणी अतिदुर्गम भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा सुरक्षारक्षक नाही. लांब प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांना साधे स्वच्छतागृहसुद्धा नाही. मोडकळीस पडलेल्या स्वच्छतागृहाने अस्वच्छतेची परिसीमा गाठली आहे. ग्रामीण भागातील येणाऱ्या प्रवासी महिला, विद्यार्थिनींनी महत्त्वाच्या विधींसाठी कुठे जायचे, असा प्रश्न उभा ठाकला आहे. महिलावर्गांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. बसस्थानकात उपाहारगृहाची जागा निश्चित केली आहे. परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे उपाहारगृह अद्याप सुरू करण्यात आले नाही. बसस्थानकात महत्त्वाचा समजला जाणारा पोलीस कक्ष आवश्यक असून या ठिकाणी पोलीस कक्षच नसल्याने प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर आहे.

सर्वांत जास्त पावसाचा तालुका असूनसुद्धा या ठिकाणी साध्या पिण्याच्या पाण्याची सुविधासुद्धा उपलब्ध नाही. प्लॅस्टिकची टाकी नावाला बसवण्यात आली असून पाणीपुरवठा होत नसल्याने या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी गैरसोय होत आहे.

मध्यवर्ती बसस्थानक असूनसुद्धा या ठिकाणी साधी प्रथमोपचार पेटी तसेच ग्रामीण भागातून तसेच शहरातून येणाऱ्या महिलांसाठी बसस्थानकात माता-बालक यांच्यासाठी स्तनपान कक्ष (फिडिंग रूम)सुद्धा उपलब्ध नाही. सार्वजनिक ठिकाणीच त्यांना स्तनपान करावे लागत आहे.

घोटी बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरच मोठमोठे खड्डे पडलेले असून सर्वत्र पाण्याचे तळे साचले आहेत.

याबरोबरच घाणीचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य असून प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.

बसस्थानकात ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थिनींना टवाळखोर मुलांचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असून या ठिकाणी पोलीस कक्ष नसल्याने मुलींची छेड ही नित्याचीच झाली आहे. या टवाळखोर मुलांच्या मनात पोलिसांबद्दलही भीती उरली नसल्याचे दिसून येत आहे.

इन्फो...

खासगी वाहनांचा कब्जा

घोटी शहरात पार्किंगचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सतावत असून तालुक्यातील व्यापारासाठी येणाऱ्या नागरिकांनी अवैध वाहनतळ उभे केले आहेत. बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात गाड्या उभ्या केल्या जात असून दिवसभर या ठिकाणी आपल्या गाड्या उभ्या करून निघून जातात. या गाड्यांचा खोळंबा बसेसला होत असताना दिसत आहे. खासगी वाहनांना रोखण्यासाठी आगार प्रमुखांनी त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

कोट :

प्रवाशांना महत्त्वाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी वारंवार वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करण्यात आले असून अजूनपर्यंत अंमलबजावणी करण्यात आली नाही. स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, स्वच्छता या मूलभूत सुविधा पुरवणे गरजेचे असून आमचा पत्रव्यवहार वरिष्ठ पातळीवर सुरू आहे.

- ए. के. आवारी, वाहतूक नियंत्रक, घोटी

110921\11nsk_38_11092021_13.jpg

घोटी बसस्थानक

Web Title: Ghoti bus stand became a hotbed of problems; Passenger safety in the air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.