नाशिक : बागलाण तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, सहा ते सात दिवस उलटूनही कृषिमंत्री, पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेले नाहीत, उलट वीज बील थकलेल्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत केला जात असल्याचा आरोप करून विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी, अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रूपये मदत देण्याची मागणी केली.शनिवारी दरेकर यांनी दिंडोरी व बागलाण तालुक्यातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या गावांना भेट देवून पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. अवकाळी पाऊस होवून बरेच दिवस उलटले तरी अद्याप शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले नाहीत. शेतकरी पूर्णपणे उद्धवस्त झाला असून गेल्या तीन वर्षापासून सातत्याने हा प्रकार घडत असतानाही शासनाकडून ठोस मदत करण्यात आलेली नाही. त्यामुळे सरकारने पंचनाम्याचे नियम, निकष न पाहता सरसकट पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा त्याच बरोबर वीज बील थकलेल्या शेतकऱ्यांचा पुरवठा खंडीत न करता त्यांना हप्ते बांधून द्यावेत तसेच बँकांची सक्तीची वसुली थांबवावी अशी मागणी केली.यावेळी आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहूल आहेर, गिरीष पालवे, लक्ष्मण सावजी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना एक लाख मदत द्या प्रवीण दरेकर : सरकारने वाऱ्यावर सोडल्याची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 1:25 AM