निसर्गसंवर्धनाचे धडे देत ‘ती’ झटतेय मुक्या जीवांसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:35 AM2021-01-13T04:35:28+5:302021-01-13T04:35:28+5:30
नाशिक : आपल्या ज्ञानाचा इतरांनाही फायदा व्हावा, या उदात्त हेतूने पर्यावरण विज्ञान शाखेतून एम.एस्सी.पर्यंत शिक्षण पूर्ण करणारी पेठरोडवरील पूजा ...
नाशिक : आपल्या ज्ञानाचा इतरांनाही फायदा व्हावा, या उदात्त हेतूने पर्यावरण विज्ञान शाखेतून एम.एस्सी.पर्यंत शिक्षण पूर्ण करणारी पेठरोडवरील पूजा कोठुळे-शिर्के ही तरुणी आपली कौटुंबिक जबाबदारी सांभाळून ‘नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ नाशिक’सोबत मागील दोन वर्षांपासून निसर्गसंवर्धनाकरिता प्रयत्नशील आहे. तिने भावी पिढीत निसर्गाविषयीची आत्मीयता आणि जागृती करण्याचा ध्यास घेतला आहे.
पूजा एनसीएसएनच्या फिल्ड ऑफिसर म्हणून काम करताना विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन ‘नेचर क्लब’च्या स्थापनेसाठी प्रयत्नशील आहे. आदिवासी भागातील जंगल आणि तेथील वन-वन्यजीवसंपदेचे महत्त्व पटवून स्थानिकांचा गैरसमज दूर करण्याचाही प्रयत्न करते. अलीकडेच लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, गंगापूर, गोवर्धन, गिरणारे, तपोवन या भागात गलोली घेऊन पक्ष्यांवर नेम धरणाऱ्या शाळकरी मुलांनाही गलोलीच्या छंदापासून परावृत्त करत हा छंद मुक्या प्राण्यांसाठी कसा जीवघेणा ठरतो, हेदेखील पटवून दिले होते. राखीव वनात जाऊन तेथील वृक्षसंपदा, पक्षीजीवन, प्राणीजीवनाचे निरीक्षण नोंदवून पर्यावरण व जैवविविधतेबाबतची माहिती वेळोवेळी संकलित करण्यासाठी पूजा प्रयत्न करते. विविध पर्यावरण व निसर्ग दिनविशेषांचे औचित्य साधत वनविभागासोबत मिळून जनप्रबोधनपर उपक्रम राबविण्यासाठी ती अग्रेसर असते. तिने घेतलेल्या निसर्गसंवर्धनाबाबत जनजागृतीचा वसा पार पाडताना कुटुंबाकडूनही तेवढेच प्रोत्साहन मिळते. आगामी मकरसंक्रांतीच्या औचित्यावर पतंगबाजीची स्पर्धा करताना पक्ष्यांवर ‘संक्रांत’ येणार नाही, याचे भान प्रत्येकाने बाळगले पाहिजे, असे पूजा सांगते.
---
फोटो आर वर ११ पूजा नावाने सेव्ह केला आहे.