चापडगावी बिबट्याच्या हल्ल्यात शेळी, बोकड ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2021 05:05 PM2021-07-06T17:05:25+5:302021-07-06T17:05:25+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील चापडगाव शिवारात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शेळी व बोकड ठार झाल्याची घटना घडली. आठ दिवसांत संबंधित शेतकऱ्याचे सुमारे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. चापडगाव शिवारात बुधवारी निवृत्ती आनंदा सांगळे यांनी शेताच्या कडेला शेळी बांधलेली होती.

बांधलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला करून तिला ओढत नेले. बिबट्याने शेळी ओढत असताना शेतकऱ्यांनी पाहिले. त्यांनी आरडाओरड करत परिसरातील लोकांना बोलावले. शेतकरी बिबट्याकडे धावून गेल्याने त्याने शेळी तेथेच सोडून पळ काढला. मात्र, शेळीचा मृत्यू झाला होता.
यात सांगळे यांचे सुमारे १५ ते २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास निवृत्ती सांगळे यांच्याच शेतात बिबट्याने हल्ला करून एक बोकड उचलून डोंगरावर पळून गेला. बोकडाची आजची किंमत सुमारे ८ ते १० हजार रुपये होती. दोन्ही घटनांमध्ये सांगळे यांचे सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
पिंजरा लावण्याची मागणी
वनविभागाने फक्त शेळीचाच पंचनामा केला व बोकड सापडत नसल्याने बोकडाचा पंचनामा केला नाही. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने परिसरात लवकरात लवकर पिंजरा लावावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी व्यक्त करीत आहेत, तसेच सांगळे यांना आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.