गोल्डनबाबांनी अंगावरील सोने घटविले
By admin | Published: December 31, 2016 01:19 AM2016-12-31T01:19:43+5:302016-12-31T01:19:56+5:30
गोल्डनबाबांनी अंगावरील सोने घटविले
त्र्यंबकेश्वर : सिंहस्थपर्वानंतर प्रथमच त्र्यंबकेश्वर येथे आलेल्या गोल्डनबाबा यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने कमी झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. आयकर विभागाची वक्रदृष्टी टाळण्यासाठी बाबांनी अंगावरील सोने कमी केल्याची चर्चा त्र्यंबकवासीयांमध्ये होत आहे. त्र्यंबकेश्वर येथील जुन्या आखाड्याचे महंत सुधीरकुमार मक्कड उर्फगोल्डनबाबा यांनी गेल्या गुरुवारी त्र्यंबकेश्वर येथे भेट देऊन त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात धार्मिक विधी केला. सिंहस्थ काळात गोल्डनबाबांचे त्र्यंबक येथे वास्तव्य होते. त्यानंतर ते हरिद्वार येथील आश्रमात परत गेले होते. सिंहस्थ काळात अंगावर १५ किलो सोन्याचे दागिने घालून फिरणारे गोल्डनबाबा गुरुवारी त्र्यंबकेश्वर येथे आले तेव्हा त्यांच्या अंगावर केवळ साडेचार किलो वजनाचे सोन्याचे दागिने होते. मानेवरील दुखण्यावर इलाज करण्यासाठी ते फरशीवाले बाबा यांच्याकडे आले होते. मात्र सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी ते रवाना झाले. या कार्यक्रमानंतर आपण त्र्यंबकेश्वर येथे येणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील आजच्या स्थितीमुळेच गोल्डनबाबा पंधरावरून साडेचार किलोवर आले असावेत, अशी चर्चा उपस्थितांमध्ये होती. दरम्यान, त्र्यंबक येथे आगमन झाल्यानंतर अनेक भाविकांनी गोल्डनबाबांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. उद्योजक असलेले गोल्डनबाबा सर्वसंग परित्याग करून साधू बनले आहेत.