सुदर्शन सारडाओझर : उमेदीच्या काळात निवृत्ती भोगत असलेला रानवड सहकारी साखर कारखाना आता प्रकाशझोतात आलेला असतानाच निसाकाच्याही चिमणीतून धूर निघण्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. निसाका सुरू करण्याबाबत सहकार क्षेत्रातील धुरिणांची कसोटी लागणार आहे.राज्याच्या सहकारी साखर कारखानदारीत एकेकाळी निफाडचा असलेला दबदबा गेल्या दोन दशकांपासून नामशेष झाला आहे. ज्या साखर कारखान्यांच्या माध्यमातून तालुक्यातील नेत्यांनी मुंबईपासून दिल्लीपर्यंत आपली वेगळी छाप उमटवली, तेच कारखाने आर्थिक संकटात सापडले असून, चुकीच्या धोरणांमुळे बंद पडले आहेत. त्यामुळे सत्ताधारी गटांचे साखर कारखानदारीमधील वलय नाहीसे झाले. निसाका-रासाकाच्या चिमण्या गंजून गेल्या असताना, त्या बॉयलरमधून धूर कसा काढता येईल यासाठी गेल्या दीड दशकात अथक प्रयत्न झाले. रासाका दोनवेळेला बाहेरच्यांनी येऊन उत्पन्न घेत एक्झिट घेतली. निवडणूक प्रचाराच्या दरम्यान अजित पवार यांनी रासाका सुरू करण्याबाबतचा शब्द दिला आणि जिल्ह्यात कादवानंतर सहकार तत्वावर दुसऱ्या कारखान्याची चाके आता फिरणार आहेत.निफाडमधील सिंचन क्षेत्र जवळपास साठ हजार हेक्टर आहे. येथील ऊस लागवडीवर आजूबाजूचे कारखाने पोट भरत असताना रासाकाची उत्पादन क्षमता वाढवून सर्वच अर्थाने येथील उद्योजकता कशी उजळून निघेल, यादृष्टीने आता बनकर पतसंस्थेला प्रयत्न करावे लागणार आहेत. निसाका हा रासाकापेक्षा अनेकपटींनी मोठा कारखाना असला तरी आर्थिक संकटात त्याचा जीव गुदमरून गेला आहे. आता रासाकाबरोबरच त्याचीही फाईल वरच्या स्तरावरून हलल्यास निफाडच्या सहकार क्षेत्राला पुनर्वैभव प्राप्त होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.टीम रासाका नेमण्याचे आव्हान रासाका कार्यस्थळावर काकासाहेब वाघ यांना अभिवादन करण्यासाठी नेते एकत्र आले, त्यातील शेजारी बसलेले अनेक नेते निसाकाचे सत्ताधीश राहिलेले आहेत. त्यामुळे पतसंस्थेचे सर्वेसर्वा आमदार दिलीप बनकर यांना टीम रासाका नेमताना इतिहासदेखील चाळावा लागणार आहे. पहिली दोन वर्षे ताक फुंकूनच प्यावे लागणार असल्याचे दिसते. रासाकाबरोबरच आर्थिक गाळात रूतलेल्या निसाकाची चाके फिरवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.