मक्याचे पैसे देण्यास शासनाकडून खळखळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 02:14 PM2018-02-01T14:14:14+5:302018-02-01T14:17:16+5:30
राज्य सरकारने शेतक-यांना दिलासा देण्यासाठी आधारभूत किमतीत म्हणजेच १,४२५ रुपये क्विंटल दराने मका खरेदी करण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी शेतक-यांना आॅनलाइन नोंदणी करण्यास भाग पाडले.
नाशिक : शेतक-यांच्या मक्याला आधारभूत किमतीत खरेदी करण्याचे आश्वासन देऊन गावोगावी खरेदी केंद्रे सुरू करणाºया सरकारने आता खरेदी केलेल्या मक्याचे पैसे शेतक-यांना देण्यासाठी खळखळ चालविली असून, दोन महिने उलटूनही शेतक-यांना मक्याचे पैसे न मिळाल्याने त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे. दुसरीकडे नोंदणी केलेला मका खरेदी करण्याचे ठरवूनही शासनाकडून गुदाम उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ केली जात असल्यामुळे शेतातील उघड्या मक्याचा दर्जाही खालावत चालल्याने अस्वस्थेत आणखी भर पडली आहे.
राज्य सरकारने शेतक-यांना दिलासा देण्यासाठी आधारभूत किमतीत म्हणजेच १,४२५ रुपये क्विंटल दराने मका खरेदी करण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी शेतक-यांना आॅनलाइन नोंदणी करण्यास भाग पाडले. नाशिक जिल्ह्यात जवळपास २५ हजारांहून अधिक शेतक-यांनी मका विक्री करण्यासाठी नोंदणी केली होती. नोव्हेंबर महिन्यापासून आधारभूत खरेदी केंद्रे सुरू करण्याचे ठरविलेले असताना प्रत्यक्षात जिल्हा प्रशासनाकडून पणन महामंंडळाला शासकीय गुदामे उपलब्ध करून देण्यास विलंब लावल्यामुळे एक महिना उशिरा म्हणजे डिसेंबरमध्ये जिल्ह्यात दहा खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली. शासनाने मात्र ३१ डिसेंबरपर्यंत नोंदणी करणाºया शेतक-यांचाच मका खरेदी करण्याचा ऐनवेळी निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील शेतक-यांमध्ये धावपळ उडाली. कारण बहुतांशी शेतकरी कांदा लागवडीत व्यस्त असल्यामुळे त्यांनी मका काढणी व विक्रीकडे दुर्लक्ष केले, परिणामी लाखो क्विंटल मका खरेदीविना पडून राहण्याची शक्यता निर्माण झाल्याने शासनाने जानेवारीतही मका खरेदी सुरू ठेवली. आजवर ८०,६३५ क्व्ािंटल मका खरेदी करण्यात आला असून, त्या पोटी साडेसहा कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. परंतु सरकारने मध्यंतरी निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत महिनाभर पैसेच न दिल्यामुळे सुमारे दीड हजारांहून अधिक शेतक-यांचे साडेचार कोटी रुपये मिळालेले नाहीत. दोन महिने उलटूनही पैसे मिळत नसल्याचे शेतक-यांचा धीर सुटत चालला आहे.
जिल्ह्यात नोंदणी केलेल्या मका उत्पादक जवळपास दोन हजार शेतक-यांचा सुमारे ६० हजार क्व्ािंटल मका अद्यापही खरेदीच्या प्रतीक्षेत असून, फेब्रुवारी महिन्यातही खरेदी केंद्रे सुरूच ठेवण्याचा निर्णय पणन महामंडळाने घेतला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात मका खरेदी सुरू असल्याने व विक्रमी संख्येने मका खरेदी करण्यात आल्याने ते ठेवण्यासाठी गुदामांचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.