द्राक्ष उत्पादक धास्तावले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 11:26 PM2019-11-30T23:26:12+5:302019-11-30T23:27:35+5:30
पाटोदा : गेल्या तीन-चार दिवसांपासून पाटोदा आणि परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे द्राक्षबागांवर डावणी, भुरी आदी रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले असून, बागा वाचविण्यासाठी महागडी औषध फवारणी करताना दिसत आहेत. ढगाळ वातावरणामुळे बुरशीनाशके व औषध फवारणीच्या खर्चातही वाढ झाली आहे. या वातावरणाचा रब्बी हंगामातील पिकांनादेखील मोठा फटका बसणार असल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.
गोरख घुसळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटोदा : गेल्या तीन-चार दिवसांपासून पाटोदा आणि परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे द्राक्षबागांवर डावणी, भुरी आदी रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले असून, बागा वाचविण्यासाठी महागडी औषध फवारणी करताना दिसत आहेत. ढगाळ वातावरणामुळे बुरशीनाशके व औषध फवारणीच्या खर्चातही वाढ झाली आहे. या वातावरणाचा रब्बी हंगामातील पिकांनादेखील मोठा फटका बसणार असल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.
आॅक्टोबर महिन्यात सुमारे पंचवीस-सव्वीस दिवस परतीच्या पावसाने थैमान घातल्याने संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला. मका, सोयाबीन, बाजरी ही पिके शेतात पाणी साचल्याने सडून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. या भागात मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन घेतले जात आहे.
आॅक्टोबर महिन्यात छाटणी केलेल्या संपूर्ण द्राक्षबागा या पावसाने वाया गेल्या. द्राक्षबागांमध्ये पाणी साचल्याने घडकुज, डावणी, मूळकुज, अशामुळे या बागा धोक्यात आल्या. शेतकरीवर्गाने एकरी दोन ते पाच लाखापर्यंत खर्च करून बागा वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र संपूर्ण बागा
वाया गेल्याने शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडला
आहे. ज्या काही शेतकऱ्यांनी पाऊस उघडल्यानंतर उशिरा पंधरा दिवसांपासून छाटणी केली आहे अशा द्राक्षबागांना गोड बहार येऊन मोठ्या प्रमाणात घड येण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या थंडीने द्राक्षबागांना भुरी रोगाचा फटका बसण्यास सुरुवात झाली होती.
त्यामुळे शेतकºयांनी बुरशीनाशके फवारणी करून रोग आटोक्यात आणले. चार-पाच दिवसांपासून थंडी पुन्हा गायब झाली असून, गेल्या तीन-चार दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होऊन ढगाळ
वातावरण निर्माण झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले असून, बागा वाचविण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून तीन ते चार वेळेस दिवसातून महागडी औषध फवारणी करावी लागत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.औषधांचा खर्च वाढलाढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागांवर डावणीचा प्रादुर्भाव व थ्रीप्सदेखील वाढले आहे तर मका पिकाची कापणी अंतिम टप्प्यात आली असल्याने मावा, तुडतुडे वाढले असल्याने त्याचाही परिणाम बागांवर झाला आहे. त्यामुळे बुरशीनाशकांच्या खर्चात वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा बुरशीनाशकाच्या खर्चात तिपटीने वाढ झाली असल्याची माहिती शेतकºयांनी दिली. येत्या काही दिवसात डावणी आटोक्यात आणण्यासाठी खर्च होऊनही जर थंडी वाढली तर भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने पुन्हा बुरशीनाशकांचा व महागड्या औषधांचा खर्च वाढणार असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.माझी सुमारे पाच एकर बाग असून, द्राक्षबागा या पोंगा अवस्थेत असताना परतीचा पावसामुळे डावणी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. डावणीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महागडी औषध फवारणी व बुरशीनाशके फवारणी करावी लागत असल्याने खर्चात मोठी वाढ झाली आहे.
- भाऊसाहेब ढोपरे, द्राक्ष उत्पादक, पाटोदा
उशिरा छाटणी केल्यामुळे बागेला गोड बहार आला आहे. द्राक्षबागही सध्या चांगली आहे मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने द्राक्षबागांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे दिवसातून किमान चार वेळेस औषधे व बुरशीनाशके फवारणी करावी लागत असल्याने अडचणी वाढल्या आहे.
-किरण बिडवे, द्राक्ष उत्पादक, पाटोदा