सध्या द्राक्ष पंढरीतील काही गावांमध्ये द्राक्ष काढणीला सुरुवात झाल्याने कोरोना काळात ७ ते ८ महिने घरी बसलेल्या मजूर वर्गाला आता काम मिळणार आहे. कोरोनाच्या काळात हाताला काम मिळत नसल्याने दिंडोरी तालुक्यातील मजूर वर्ग हतबल झाला होता. हाताला काम नसल्याने कमविलेले सर्व पैसे संपले होते. त्यामुळे संसाराचा गाडा कसा ओढायचा, या काळजीने मजूर वर्ग त्रस्त झाला होता, परंतु आता काही ठिकाणी द्राक्षे काढणीस सुरुवात झाली आहे. त्यामुळे मजूर आपल्या ठरावीक व्यापारी वर्गाच्या भेटी घेऊन कामाला प्रारंभ करण्याची भूमिका घेत आहे. त्यांच्या कामाच्या पद्धती ठरलेल्या असतात. जे मजूर पॅकर ( द्राक्ष बॉक्स पॅकिंग करणारे मजूर) आहेत, त्यांना इतर मजुरांपेक्षा जास्त वेतन दिले जाते. त्यामुळे व्यापारी वर्गातून चांगल्या पॅकरची मागणी होत असते. कारण जेवढा पॅकर चांगला तेवढा माल लवकर पॅकिंग करून बाजारपेठेत लवकर पाठविण्यास मदत मिळते. त्यामुळे पॅकर होण्यासाठी प्रत्येक मजुरांची धडपड असते.दिंडोरी, निफाड, उगाव, पिंपळगाव बसवंत, खेडगाव, वणी, ओझरमिग ,मोहाडी, जानोरी, पिंपळणारे, वडनेरभैरव इ. ठिकाणी बनारस, युपी, एमपी, कोलकाता, गुजरात, दिल्ली, हरयाणा, झाशी इ. राज्यांतील द्राक्ष व्यापारी मोठ्या प्रमाणात येत असतात. प्रत्येक व्यापारी वर्गाकडे साधारणपणे १५० ते २०० मजूर कामांसाठी लागतात. व्यापारी वर्ग स्थानिक मजुरांमधील लोकांना हाताशी धरून त्याला मुकादम बनवितात. त्यामुळे मजूर भरतीचे मुकादमच करीत असल्याने व्यापारी वर्गाला मजूर टंचाई जाणवत नाही.साधारणपणे तीन ते चार महिन्यांचा हा द्राक्ष काढणीचा हंगाम असतो. त्यामुळे मजूर वर्गाला काम मिळत असते. व्यापारी वर्ग मजूर वर्गाच्या कामांचे वेतन आठवड्याला अदा करीत असल्यामुळे मजूर वर्ग खूश असतो.
परप्रांतीय व्यापाऱ्यांचे आगमन झाल्याने द्राक्ष हंगाम सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 4:10 PM