बाजीराव कमानकरमुकं करोती वाचालम:पंगुं लंगे यते गिरींयत कृपा तमहं वंदे:परमा नंद माधवा..शरीराने अपंग असले तरी दुर्दम्य इच्छाशक्ती प्रचंड आत्मविश्वास असेल तर पांगळा मनुष्यदेखील पर्वत ओलांडून जाऊ शकतो. वरील सुभाषित भेंडाळी येथील अपंग शेतकरी हरिदास सातपुते यांना योग्य प्रकारे लागू पडते. अपंगावर मात करून दीड एकर क्षेत्रावर द्राक्षबागेची लागवड करून सलग दोन वर्षे आंतराष्ट्रीय बाजारपेठेत द्राक्ष निर्यात करून लाखो रुपयांचे उत्पन्न त्यांनी मिळविले असून, तिसºया वर्षीदेखील त्यांची त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. बालपणात पोलिओग्रस्त सातपुते यांच्यावर गरिबीमुळे कोणतेही उपचार होऊ शकले नाही. एका पायाने कायमचे अपंगत्व आलेले सातपुते यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. नोकरीसाठी अनेक ठिकाणी अर्ज केले. अपंग असूनही त्यांना नोकरी मिळाली नाही. आई-वडील यांनी संपूर्ण आयुष्य सायखेडा येथे कांदा गुदामांची राखण करून घालविले.नोकरी-धंदा नसल्याने खचून न जाता हरिदास यांनी वडिलांची वर्षानुवर्षे पडीत जमिनीवर शेती करण्याचा निर्णय घेऊन शेतीला सुरुवात केली. काही वर्षे पारंपरिक पद्धतीने शेती करून कुटुंब सावरले. तरी काहीतरी वेगळे करण्याची उमेद हरिदास सातपुते यांना स्वस्त बसू देत नव्हती. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपल्या दीड एकर क्षेत्रावर त्यांनी द्राक्ष लागवड केली. मुबलक पाणी, कष्ट करण्याची प्रवृत्ती, प्रचंड इच्छाशक्ती, आत्मविश्वास यामुळे पहिल्याच वर्षी द्राक्ष पीक जोरात आले. नशिबाची साथ मिळाल्याने त्यांच्या बागेतील द्राक्ष युरोपच्या बाजारपेठेत पोहचली. सलग दुसºया वर्षीदेखील एक्सपोर्ट द्राक्ष झाल्याने त्यांचा आणि कुटुंबाचा आत्मविश्वास वाढला. दोन वर्षे दीड एकर क्षेत्रात सातपुते यांना अनुक्रमे दहा लाख व नऊ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. मागील वर्षी इंग्लंड येथील द्राक्ष व्यापाºयांनी बागेला भेट देऊन समाधान व्यक्त केले होते. यंदा ओखी वादळ, प्रचंड थंडी ,बेमोसमी पाऊस यासारखी नैसिर्गक आपत्ती येऊन देखील योग्य प्रकारे नियोजन करून त्यांनी आपली बाग वाचवली आहे. परिसरातील द्राक्ष बागेत भुरी, कुज यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत असला तरी सातपुते यांचे पीक जोमात आहे. यंदा देखील द्राक्ष निर्यात होतील असा विश्वास त्यांना आहे. कर्जबाजारीपनामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करतात. त्यांनी हरिदास सातपुते यांच्याकडुन आदर्श घ्यायला हवा. तालुक्यातील अनेक शेतकरी सातपुते यांचे निर्यातक्षम द्राक्ष पाहण्यासाठी येत असतात. अपंग सातपुते यांना पाहिल्यानंतर उत्तम नियोजन केले तर शेती तोट्यात नाही आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीत भरघोस उत्पन्न मिळते नोकरी मिळाली नाही तर खचून न जाता आत्मविश्वासाने उभे राहिले पाहिजे . असा संदेश सातपुते देत आहेत.