सटाणा : बागलाण तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी येथील पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.सकाळी ११ वाजेपासून येथील पंचायत समिती कार्यालयासमोर संघटनेचे तालुकाध्यक्ष धर्मा जाधव यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. ७ आॅगस्ट २०१३ च्या अधिसूचनेनुसार लागू केलेल्या वेतनाची अंमलबजावणी करावी, फरकासह वेतन अदा करावे, राहणीमान भत्ता किमान वेतनासह मिळावा, जिल्हा परिषदेकडून एप्रिल २०१५ ते नोव्हेंबर २०१५ अखेरचे किमान वेतन त्वरित अदा करावे, पीएफ नियमित जमा करावा, सेवापुस्तक अद्यावत करावेत, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रेज्युईटी व अर्जित रजेचा लाभ मिळावा आदि मागण्या होत्या. दरम्यान, गटविकास अधिकारी डी.एम. बहिरम, सहाय्यक गटविकास अधिकारी महेंद्र कोर यांनी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांवर सकारात्मक चर्चा घडवून आणली.यावेळी गटविकास अधिकारी बहिरम यांनी जानेवारीपासून राहणीमान भत्ता लागू करण्याबरोबरच चोवीस नंबर प्रमाणे ग्रामपंचायत वेतन अदा करण्याबाबतच्या मागण्या तत्काळ मान्य केल्या व उर्वरित मागण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार पाठविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात तालुकाध्यक्ष धर्मा जाधव यांच्यासह अशोक अहिरे, उज्ज्वल गांगुर्डे, नरेंद्र मोरे, अरुण बच्छाव, निवृत्ती अहिरे, निंबा पवार, बाळू सोनवणे, हिरूबाई खैरनार आदि सहभागी झाले होते. (वार्ताहर)
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे धरणे
By admin | Published: March 14, 2016 11:32 PM