शहरात घरोघरी गुढीपाडव्याचा उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:14 AM2021-04-14T04:14:15+5:302021-04-14T04:14:15+5:30
कोरोना असूनही सणाचा उत्साह ठिकठिकाणी दिसून आला. सकाळी घरोघर विधिवत गुढी उभारण्यात आली. आंब्याची आणि कडुनिंबाची पाने गुढीवर लावतानाच ...
कोरोना असूनही सणाचा उत्साह ठिकठिकाणी दिसून आला. सकाळी घरोघर विधिवत गुढी उभारण्यात आली. आंब्याची आणि कडुनिंबाची पाने गुढीवर लावतानाच कडुनिंबाच्या पाल्याचा, तसेच गूळ आणि धने मिळवून खास प्रसाद तयार करण्यात आला. गुढीची पूजा करताना नव्या वर्षाच्या पंचागांचे पूजन करण्यात आले, तसेच नव संवत्सर फल वाचून करण्यात आले आणि नूतन वर्ष मंगलमय आणि विशेष करून आरोग्यदायी जावे, यासाठी प्रार्थना करण्यात आली.
घरोघर गुढीपाडव्याचा उत्साह कायम असला, तरी साडेतीन मुहूर्तावर खरेदी, तसेच गुंतवणूक मात्र यंदा होऊ शकलेली नाही. दरवर्षी गुढीपाडव्याचा उत्साह असतो. मात्र, गेल्या वर्षी कोरोनाचे संकट आल्यानंतर गुढीपाडव्याच्या उत्सवावर मर्यादा आली होती. यंदा नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंतचे कोरोनाचे सावट कमी झाल्याने बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण होते. मात्र, कोरोना पुन्हा वाढला आणि बाजारपेठेवर चिंतेचे सावट दाटले. त्यातच गेल्या ५ एप्रिलपासून राज्य शासनाने महिनाभराचे निर्बंध घातले असल्याने, त्याचा फटका बसला. सराफ बाजार बंद असल्याने सुवर्ण खरेदी, तसेच मेाटारी आणि गृहखरेदीचे मुहूर्त टळले.
इन्फो...
नवे वर्ष स्वागत यात्रा रद्द
नववर्ष स्वागतासाठी शहराच्या विविध भागांतून दरवर्षी पारंपरिक पेाशाखात स्वागत यात्रा काढण्यात येतात. ढोल-ताशांच्या गजरात होणाऱ्या या यात्रेचा उत्साह काही औरच असतो. मात्र, यंदा कोरोनामुळे घातलेल्या निर्बंधामुळे अगोदरच स्वागत यात्रा रद्द करण्यात आल्या होत्या.
कोट...
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि व्यवसायावरील निर्बंध, यामुळे यंदा गृहनिर्माण क्षेत्राला पाडव्याचा फायदा झाला नाही. साइटवर अगदी मोजक्याच नागरिकांनी भेटी दिल्या. अनेकांनी गृहखरेदीचे नियोजन पुढे ढकलले आहेत. अर्थात, लवकरच सर्व काही सुरळीत होईल, अशी खात्री आहे.
- रवि महाजन, अध्यक्ष, क्रेडाई मेट्रो, नाशिक
कोट...
सराफ बाजारात दरवर्षी पाडव्यासारख्या मुहूर्तावर होणारी सुमारे चाळीस कोटी रुपयांची उलाढाल होऊ शकली नाही. सराफ असोसिएशनने सुरुवातीपासूनच कोरोना संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकारला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता संधी हुकली, तरी अक्षय तृतीया मुहूर्तापर्यंत सर्वकाही सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे.
- गिरीश नवसे, अध्यक्ष, नाशिक सराफ असोसिएशन