‘सैन्य दलातील संधी’विषयी इच्छुकांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:19 AM2019-03-21T00:19:25+5:302019-03-21T00:19:55+5:30
भारतीय सैन्याचे वायुदल, नौदल आणि आर्मी या तिन्ही सैन्य दलांत अधिकारी होण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत.
नाशिक : भारतीय सैन्याचे वायुदल, नौदल आणि आर्मी या तिन्ही सैन्य दलांत अधिकारी होण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. परंतु, या संधी प्राप्त करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आवश्यक गुणवत्तेसोबतच सदृढ शरीर आणि मुलाखतीसाठी स्वत:चा सर्वांगीन व्यक्तिमत्व विकास साधणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शन रॅपिड फोर्सचे माजी कमांडर लेफ्टनंट कर्नल डी. आर. गोडबोले यांनी केले.
बाबूभाई राठी सभागृहात महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रिकल्चरतर्फे भारतीय ‘सैन्य दलात अधिकारी म्हणून करिअरच्या संधी’ विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. सैन्य दलात भरती होण्यासाठी आवश्यक गुणवत्ता, बौद्धिक चाचणी, शारीरिक क्षमता, करावे लागणारे प्रयत्न, भरती होण्यासाठी शैक्षणिक पात्रता, मुलाखतीची तयारी यासोबतच अधिकारी म्हणून भरती झाल्यानंतर मिळणारे फायदे याबाबत भोसला मिलिटरी कॉलेजच्या प्रा. स्नेहा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. देशासाठी काम करण्याची इच्छा असतानाही भरती होता येत नाही त्यासाठी अशा मार्गदर्शन शिबिरांतून निश्चितच सर्वांना फायदा होईल, असा विश्वास महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना केले. उद्योजक चंद्रन नांबियार यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक श्रीधर व्यवहारे यांनी केले. सूत्रसंचालन हेमांगी दांडेकर यांनी केले. यावेळी सुनीता फाल्गून, स्वप्नील जैन, डॉ. मिथिला कापडणीस, सोनल दगडे आदींसह सैन्यदलात भरती होण्यास इच्छुक उमेदवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.