थेट पक्ष कार्यालयांतून...नाशिक : शिवसेनेला राज्यात १७ ते २० जागा मिळू शकतील आणि त्यामध्ये नाशिकमधून हेमंत गोडसे इतिहास घडवतील, असा अंदाज एक्झिट पोलने वर्तविल्यापासूनच शिवसेनेमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता. त्यांच्यातील हा उत्साह मतमोजणीच्या दिवशी कमालीचा दिसून आला. सकाळपासूनच शिवसनेच्या पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांनी ठाण मांडले होते. पक्ष कार्यालयातील दूरचित्र संचावर निकाल पाहताना शिवसनेचा जयघोष सतत सुरू होता. यामध्ये सेनेच्या महिला आघाडीचा उत्साह बघण्यासारखा होता. प्रत्येकाला उत्सुकता होती ती हेमंत गोडसे यांच्या विजयाच्या घोषणेची. गोडसे यांची आघाडी वाढत गेली तसतसे कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी वाढत गेली आणि गुलालची उधळण करण्यात आली.सकाळी ७ वाजेपासून कार्यकर्ते पक्ष कार्यालयात जमा झाले होते. सकाळी प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर देशभरातून भाजपाच्या विजयाचा कल आल्यानंतर कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली होती. सेनेच्या कार्यालयात लावण्यात आलेल्या टीव्हीवर निकालाचे अपडेट जसजसे जाहीर होत होते तसतसा जल्लोष वाढत होता. हेमंत गोडसे यांनी निर्णायक आघाडी घेतल्यानंतर गोडसे आपल्या संपर्क कार्याेलयात दाखल झाले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत विजयाचा जल्लोष साजरा केला. तेथून गोडसे कार्यकर्त्यांस शिवसेना कार्याेलयात दाखल झाले आणि सुरू झाला त्यांच्यावर शुभेच्छा आणि गुलालाची उधळण. गोडसे सेना कार्याालयात दाखल झाल्याने कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोर्ठी गर्दी झाली होती. त्यांच्या मिरवणुकीसाठी ‘नाशिककरांनी इतिहास घडविला’ असे फलक असलेला रथ तयार ठेवण्यात आला होता.दरम्यान, विजयदृष्टीपथात येताच शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, मंत्री दादा भुसे यांनी कार्यालयात येऊन कार्यकर्त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यालयात शिवसेनेचे शहर आणि जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला.सकाळपासूनच भाजपा कार्यालयात उत्साहएक्झिट पोलने निर्विवाद बहुमत दाखविल्यापासून प्रचंड आत्मविश्वास दुणावलेल्या भारतीय जनता पार्टी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सकाळचे कल हाती येताच जल्लोषाला सुरुवात केली. शहरातील भाजपाच्या वसंतस्मृती कार्यालयात एकत्र आलेल्या नेते, कार्यकर्त्यांनी फटाके फोडून विजयाचा जल्लोष केला. पहिला निकाल हाती येताच ‘भारत माता की जय’ आणि नरेंद्र मोदी यांच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
शिवसेना कार्यालात विजयाचा गुलाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 1:58 AM