माजी नगरसेवकाच्या घरावर चौफेर गोळीबार, शहरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 08:59 AM2020-02-27T08:59:30+5:302020-02-27T08:59:41+5:30

घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक संदीप घुगे,उप अधिक्षक रत्नाकर नवले

gun fires at former councilor's municipal corporation, causing panic in the city of nashik | माजी नगरसेवकाच्या घरावर चौफेर गोळीबार, शहरात खळबळ

माजी नगरसेवकाच्या घरावर चौफेर गोळीबार, शहरात खळबळ

Next

मालेगाव मध्य (नाशिक) : शहरातील अपर पोलीस अधिक्षक कार्यालयापासून जवळच असलेल्या उच्चभ्रु भागातील महेश नगर येथे रात्री दोन वाजता दोन अज्ञात तरुणांनी माजी नगरसेवक रिजवान खान यांच्या निवासस्थानी चौफेर गोळीबार केला. खान दांम्पत्याच्या निवासस्थानाच्या चारही बाजुंनी गोळीबार करुन जीवघेणा हल्ला करण्यात आला. सुदैवाने सतर्कतेमुळे खान दाम्पत्य या हल्ल्यातुन बचावले. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक संदीप घुगे,उप अधिक्षक रत्नाकर नवले,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहु यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी माजी नगरसेवक प्रा.रिजवान खान अमानउल्ला खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या महेश नगर येथे माजी नगरसेवक रिजवान खान (५०)याचे निवासस्थान आहे. गुरुवार(२७)रोजी रात्री दोन वाजता अज्ञात व्यक्तीने घराची बेल वाजवली. काही वेळेतच पुन्हा बेल वाजली व रिजवान दार उघड असे जोरात ओरडुन आवाज देवू लागले.खान दरवाजा उघडण्यासाठी जात असतांनाच पत्नी समीना कौसर यांनी दार उघडू न देता प्रथम कोण आहे पहा सांगितले. त्यामुळे खिडकीचा पडदा बाजूला करून पाहिले असता बंगल्याच्या आवारात तोंडावर कपडा बांधलेले व हाती पिस्टल असलेले दोन इसम दिसले. त्यामुळे खान दांम्पत्याने मागील खोलीत गेले.खान यांनी प्रसंगावधान राखत घराचे लाईट बंद केल्याने हल्लेखोरांनी बंगल्याच्या हॉल मधील खिडकीतून प्रथम गोळीबार केला.त्यानंतर पुन्हा रिजवान बाहेर निकल म्हणत डायनिंग रुम, स्वयंपाकगृह, शौचालयाच्या खिडकीतून अशा प्रकारे बंगल्याच्या चारही बाजूंनी सुमारे सात राउंड फायर केले.  मागील बाजूस असलेल्या स्वयंपाकगृहाचा द्वाराची कडी तोडण्याचा प्रयत्न केला. याप्रकाराने मोठ्या धैर्याने रिजवान खान यांनी समोर राहत असलेल्या जनता दलाचे सचिव व नगरसेवक मोहंमद मुस्तकिम डिग्नीटी व पत्रकार जहुर खान यांना भ्रमणध्वनी वरुन संपर्क साधुन यासंदर्भात माहिती दिली. जहुर खान यांनी पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले व मनपाच्या अग्निशामक दलाच्या जवानांना माहिती दिली.अग्नीशामक दलाच्या जवानांनी सायरण वाजविल्याने हल्लेखोरांनी येथुन पळ काढला. हल्लेखोरांनी प्रथम उभ्या असलेल्या कारची चाचपणी केली असल्याचे दिसून आले आहे.याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात रात्री दोन अज्ञात हल्लेखोरांविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आहे. घटनेची वार्ता धडकताच महागठबंधन नगर सेवक अब्दुल बाकी, मन्सुर अहमद, मोहंमद आमीन, जाहिद शेख, तालुका पॉवरलुम संघटनेचे अध्यक्ष हाजी युसुफ इलियास, डॉ.सईद अहमद फारान यांच्या सह राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी घटनास्थळी धाव घेतली होती. अपर पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी हल्लेखोरांचा शोध घेण्याबाबत अधिकाऱ्यांना आदेश दिले आहे.याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख करीत आहे.

Web Title: gun fires at former councilor's municipal corporation, causing panic in the city of nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.