सिमकार्ड बदलून ‘बडे बाबा’ देत होता गुंगारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:13 AM2020-12-25T04:13:50+5:302020-12-25T04:13:50+5:30
‘बडे बाबा मच्छिंद्रनाथ ट्रस्ट’ स्थापन करून संशयित भोंदू गणेश जयराम जगताप (३७) याच्याविरुद्ध ६ मार्च २०२० रोजी फिर्यादी जगन्नाथ ...
‘बडे बाबा मच्छिंद्रनाथ ट्रस्ट’ स्थापन करून संशयित भोंदू गणेश जयराम जगताप (३७) याच्याविरुद्ध ६ मार्च २०२० रोजी फिर्यादी जगन्नाथ खंडेराव जाधव यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद देत ५२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. यानंतर सातपूर भागातील उखाजी दीपाजी चौधरी यांनाही जमिनीतून सोने काढून देण्याचे आमिष दाखवून सुमारे ११ लाख २६ हजारांना गंडविले होते. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात संशयित गणेशानंदगिरीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर संशयित भोंदूबाबा नाशकातून फरार झाला. दरम्यान, सातपूर, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हेशोध पथक त्याच्या मागावर होते; मात्र त्यांना या भोंदूबाबाचा सुगावा लागत नव्हता.
गुन्हे शाखेेचे उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाला दिले. यानुसार पथकाने तपासाची चक्रे फिरविली. दरम्यान, हा बाबा विविध शहरांमध्ये लॉकडाऊन काळात तारांकित रिसॉर्ट, हॉटेलमध्ये वास्तव्य करत असल्याची माहिती पोलिसांना मिळत होती; मात्र त्याचे मोबाईल लोकेशन सातत्याने बदलत होते, यामुळे पोलिसांना त्याच्यापर्यंत पोहचणे कठीण होत होते. दरम्यान, तांत्रिक विश्लेषण शाखेकडूनही या बाबाच्या मोबाईल नेटवर्कच्या हालचालींवर ‘वॉच’ ठेवला जात होता; मात्र भोंंदू बाबा स्वत:ला पोलिसांपासून दूर ठेवण्यासाठी अत्यंत चलाखीने विविध नेटवर्क कंपन्यांचे सिमकार्ड वापरत होता.
अखेर १५ डिसेंबर रोजी युनीट-१चे पोलीस नाइक शांताराम महाले यांना या भोंदूबाबाविषयी खात्रीशीर खबऱ्याकडून तो मुंबईत असल्याची माहिती मिळाली. महाले यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांना याबाबत सांगितले. वाघ यांनी तत्काळ पथक तयार करून मुंबईत रवाना केले.
--इन्फो--
आढळले बनावट सोन्याचे ४० कॉइन्स
पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे काश्मिरा पोलीस ठाणे हद्दीतील हाटकेश भागात असलेल्या एका नामांकित आलिशान क्लबमध्ये भोंदू गणेशानंदगिरी बाबा आनंद लुटत होता. पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून त्यास बेड्या ठोकल्या. त्याची कसून झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून पोलिसांना ४ वेगवेगळ्या प्रकारचे भारतीय रिझर्व्ह बँकेचे लोगो असलेले सोन्याचे बनावट ४० नाण्यांसह कोरे स्टॅम्पपेपर मिळून आले होते. या भोंदूबाबाला पोलिसांनी ‘खाक्या’ दाखविताच त्याने वरील दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली.
---इन्फो--
धनादेश बाऊन्सप्रकरणी १४ गुन्हे
बहुतांश लोकांना या भोंदूबाबाने खोटे आश्वासने व आमिष दाखवून विविध रकमेचे धनादेश दिले होते; मात्र त्याच्या बँक खात्यात शिल्लक रक्कमच नसल्यामुळे त्याने दिलेले धनादेश वटले नाही. यामुळे संबंधितांनी त्याच्याविरुध्द विविध पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या. त्याच्याविरुद्ध असे १४ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.