नाशिक- सियावर राम चंद्र की जय अशा जयघोषांनी शहरातील उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात जयघोष करण्यात आला. मर्यादीत रामभक्तांच्या उपस्थितीत पुजा अर्चा करून रामनामाचा जप करण्यात आला.
शहरात पंचवटी भागात राम मंदिरे अधिक आहेत. त्यातील मुख्य काळाराम मंदिर वगळता गोरा राम, बायकांचा राम आणि अन्य मंदिरे बंद असले तरी देखील भाविकांनी काही प्रमाणात पुजाऱ्यांनी धार्मिक कार्यक्रम केले. राम नामाचा जप करतानाच घंटानाद आणि शंखध्वनी करण्यात आला. तपोवनातील मनीरामजी की बडी छावणी या प्रख्यात आखाड्याशी संबंधीत लक्ष्मीनारायण मंदिरात महंत रामसनेहीदास महाराज यांच्या उपस्थितीत राम अर्चना व अन्य विधी सुरू असून पंचवटीतील पंचमुखी हनुमान मंदिरात देखल महंत भक्तीचरणदास महाराज मंदिरात राम रक्षा स्तोत्र आणि अन्य पुजा विधी पार पडले.
नाशिकरोड विभागात एकलहरे परीसरात राम मंदिरात आरती आणि अन्य धार्मिक विधी करण्यात आले. इंदिरा नगर परीसरात श्री प्रतिष्ठानच्या वतीने बारा फुट श्री रामचंद्रांची प्रतिकृती उभारण्यात आली होती. तर चेतना नगर परीसरात श्रीराम मंदिरात नगरसेविका पुष्पा आव्हाड यांनी श्री रामाच्या मूर्तीची पुजा केली. श्रीराम नगर येथील दशरथनंदन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने देखील मंदिरात पुजा करण्यात आली. सायंकाळी अनेक मंदिरांमध्ये दीप प्रज्वलन करण्यात येणार आहे. अर्थात, नियमांचे पालन करून आणि पोलीसांच्या सूचनांचे पालन करूनच कार्यक्रम करण्यात आले. शहरात राम मंदिराच्या निर्माणाचा उत्साह असला तरी कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रम करता येत नसल्याने सध्या घरीच कार्यक्रम होत आहेत.