राजस्थानमधून सापुतारा मार्गे थेट नाशकात दोन कंटेनर भरून आणला गुटखा; पोलिसांनी उधळला कट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 07:02 PM2021-01-17T19:02:01+5:302021-01-17T19:03:33+5:30
या गुन्ह्यात ग्रामीण पोलिसांनी गुटख्याचा माल व कंटेनर असा सुमारे १ कोटी ६४ लाख ३७ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : राज्यात गुटख्याची विक्री, साठवणूक आणि वाहतुक यावर प्रतिबंध असतानासुध्दा राज्यात विक्रीिसाठी चोरट्या मार्गे राजस्थानच्या दोन कंटेनर भरुन मोठ्या प्रमाणात गुटखा नाशिकमध्ये आणला जात होता; मात्र पोलिसांनी गुटखा पुरवठादार-खरेदीदारांचा हा कट हाणून पाडला. वणीजवळील करंजखेड फाट्यावर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने सापळा रचून हे कंटेनर रोखले. सुमारे १ कोटी २४ लाख ३४ हजार ७३० रुपयांचा गुटख्याचा मोठा साठा या कंटेनरमधुन जप्त करण्यास पोलिसांना यश आले आहे.
राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला गुटखा व सुगंधित तंबाखुचा मोठा साठा नाशिक-सापुतारा मार्गावरुन वणी येथून शहराकडे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली. या माहितीच्याअधारे त्यांनी त्वरित वणी पोलीस ठाण्याचे सहायक निरिक्षक स्वप्नील राजपुत सचिन पाटील यांना सापळा रचण्याचे आदेश दिले. करंजखेडजवळील फाट्यावर पोलिसांनी शनिवारी (दि.१६) रात्री सापळा रचला. यावेळी संशयास्पद कंटेनर (आर.जे. जीए३९१४) आणि दुसरा कंटेनर (आर.जे.३० जीए ३८२४) एकापाठोपाठ आले असता पोलिसांनी शिताफीने ते रोखले. या दोन्ही कंटेनरची पथकातील पोलीसांनी झडती घेतली असता यामध्ये मिराज कंपनीचा राज्यात विक्री, वाहतुक आणि साठवणुकीवर बंदी असलेला गुटखा व तंबाखुजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळून आला.
यामुळे पोलिसांनी तत्काळ या दोन्ही कंटेनरचे चालक, वाहक संशयित महेंद्रसिंग, शंबुसिंहानी सोलंकी (३८,रा. उदयपुर), शामसिंग चतुरसिंह राव (४४), अर्जुनसिंग जसवंतसिंग राणावत (५६,दोघे, रा. बिदसर, चितोडगड), लोगल मेहवाल (४८,रा. उदयपुर) यांना गुटख्याची नाशिकमार्गे राज्यात विक्रीच्या उद्देशाने वाहतुक करताना आढळून आल्याप्रकरणी ताब्यात घेतले. त्यांनी गुटख्याच्या अवैध वाहतुकीसाठी वापरलेले दोन्ही मोठे कंटेनर जप्त करण्यात आले आहे. या गुन्ह्यात ग्रामीण पोलिसांनी गुटख्याचा माल व कंटेनर असा सुमारे १ कोटी ६४ लाख ३७ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.