एचएएल कारखाना दोन शिफ्टमध्ये सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 10:39 PM2020-05-10T22:39:38+5:302020-05-10T22:42:12+5:30
ओझर टाउनशिप : येथील एचएएल कारखान्यातील काम पूर्वपदावर सुरू झाले असून, कंटेन्मेंट झोन वगळून इतरत्र राहणारे कामगार व अधिकारी यांना कारखान्यात कामावर येण्यास व्यवस्थापनाने परवानगी दिली असल्याने कामगार, अधिकारी व कंत्राटी कामगार सर्व नियमांचे पालन करीत रोज कामावर उपस्थित राहत असून, दोन वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये काम करीत आहेत. प्रत्येक शिफ्ट ८ तासांची आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये या पार्श्वभूमीवर एचएएल व्यवस्थापनाने केंद्र शासनाच्या आदेशानुसार २३ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउनमुळे कारखान्यातील काम बंद ठेवून कामगार व अधिकारी यांना सुट्टी दिली होती. त्यानंतर १५ एप्रिल ते ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढविला. दरम्यान, २० एप्रिलपासून परिस्थिती बघून लॉकडाउनमध्ये शिथिलता आणल्यामुळे कारखाना सुरू करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला, त्यानुसार एचएएल कारखाना सोमवारपासून (दि. २० एप्रिल) सुरू झाल्यानंतर दक्षता म्हणून फक्त ओझर टाउनशिपमध्ये राहणारे एचएएल कामगार व अधिकारी (एकूण १४५४) यांनाच कामावर येण्याची परवानगी व्यवस्थापनाने दिली होती.
एचएएल कामगार पिंपळगाव, चांदवड, जानोरी, मोहाडी, नाशिक, सिन्नर आदी ठिकाणी राहावयास आहे यापैकी काही ठिकाणी रेडझोन असल्यामुळे त्यांना कामावर रुजू होण्यासाठी परवानगी दिली नव्हती. त्यामुळे कारखान्यात एकूण १२५० ते १३०० कामगार व अधिकारी उपस्थित राहत होते. काही दिवसांनंतर ग्रामीण भागात राहणाऱ्या कामगारांना कामावर उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली. कामगारांची कामाच्या ठिकाणी गर्दी होणार नाही, कामगार एकमेकांत ठरावीक अंतर ठेवून काम करू शकतील या दृष्टिकोनातून एचएएल कारखान्यात दोन शिफ्ट करण्यात आल्या. एक शिफ्ट ५ तासांची करण्यात आली होती. फर्स्ट शिफ्ट सकाळी ७ ते १२, व सेकंड शिफ्ट दुपारी १ ते सायंकाळी ६ त्यानंतर बदल होऊन शनिवारपर्यंत ७ तासांची शिफ्ट करण्यात आली होती आणि सोमवारपासून आठ तासांची शिफ्ट करण्यात आली असून, फर्स्ट शिफ्ट सकाळी ७ ते दुपारी ३ व सेकंड शिफ्ट दुपारी सव्वातीन ते रात्री ११.१५ पर्यंत असणार आहे. कामगार व अधिकारी त्यांना विभागून दिलेल्या शिफ्टमध्ये काम करणार आहेत.