एचएएल करणार निर्मिती : ‘कॅट्स’ला मिळणार रशियन कामोव्ह-२२६टी लढाऊ हेलिकॉप्टर
By अझहर शेख | Published: November 24, 2018 01:22 PM2018-11-24T13:22:34+5:302018-11-24T13:24:29+5:30
रशियन बनावटीचे ६० कामोव्ह हेलिकॉप्टर भारताच्या सैन्य दलात येणार असून, उर्वरित १४० हेलिकॉप्टरचे उत्पादन भारतात केले जाणार आहे. विशेष म्हणजे भारतामध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) रशियन संरक्षण फ र्मसोबत यासाठी संयुक्त करार केला आहे.
नाशिक : येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट्स) ताफ्यात आगामी काही महिन्यांमध्ये अत्याधुनिक रशियन बनावटीचे कामोव्ह-२२६टी हलक्या वजनाचे लढाऊ हेलिकॉप्टर दाखल होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
भारताने रशियाच्या संरक्षण खात्यासोबत केलेल्या संयुक्त करारांतर्गत रशियाच्या मदतीने कामोव्ह-२२६टी या हलक्या लढाऊ हेलिकॉप्टरची भारतात निर्मिती केली जाणार आहे. भारतीय सैन्य दलासाठी ही आनंदाची बातमी असून, कामोव्ह हे बहुद्देशीय हलके लढाऊ हेलिकॉप्टर सैन्याकडे सध्या असलेल्या चित्ता, चेतक या लढाऊ हेलिकॉप्टरची जागा घेणार आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये लढाऊ वैमानिकांना प्रशिक्षणासाठीदेखील भविष्यात ‘कामोव्ह-२२६टी’ हे हेलिकॉप्टर उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे. कारण कामोव्ह निर्मितीचा मार्ग मागील वर्षी मोकळा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियासोबतच्या संयुक्त उपक्रमांतर्गत करार स्वाक्षरी केला आहे. रशियन बनावटीचे ६० कामोव्ह हेलिकॉप्टर भारताच्या सैन्य दलात येणार असून, उर्वरित १४० हेलिकॉप्टरचे उत्पादन भारतात केले जाणार आहे. विशेष म्हणजे भारतामध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) रशियन संरक्षण फ र्मसोबत यासाठी संयुक्त करार केला आहे.
लढाऊ हेलिकॉप्टरचे लवकरच आगमन
आगामी दोन वर्षांमध्ये भारताच्या संरक्षण खात्यात आमूलाग्र बदल होताना दिसून येतील. नुकतेच सैन्य दलात देवळालीच्या तोफखाना केंद्राद्वारे हॉवित्झर आणि वज्र या तोफांचे आगमन झाले. तसेच लवकरच गांधीनगरच्या कॅट्सच्या मैदानावरून सैन्य दलात नव्या अत्याधुनिक अशा लढाऊ हेलिकॉप्टरचे आगमन होईल, असा विश्वास संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केला. भारत-रशियाच्या संयुक्त करारांतर्गत होणाऱ्या हेलिकॉप्टरच्या निर्मितीचा मोठा प्रकल्प एचएएलच्या मदतीने पूर्णत्वास येणार आहे. त्यामुळे एचएएलकडे काम नाही किंवा एचएएल बंद पडणार या निव्वळ अफवाच असल्याचे त्यांनी सांगितले.
चित्ता, चेतक अन् ध्रुव ‘कॅट्स’चा कणा
‘कॅट्स’मध्ये लढाऊ हेलिकॉप्टरचालनाचे प्रशिक्षण दिले जाते. लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांची तुकडी वर्षभराचे खडतर व शास्त्रशुध्द प्रशिक्षण घेत देशसेवेसाठी सज्ज केली जाते. कॅट्स हे अत्याधुनिक असे भारतीय सैन्याचे प्रशिक्षण केंद्र आहे. गांधीनगर येथे स्वतंत्ररीत्या या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. येथे युद्धजन्य व आपत्कालीन परिस्थितीत हेलिकॉप्टर चालनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते.