मागील वर्षीसुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असल्याने लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. या कालावधीत अनेक महिने दारूविक्री आणि निर्मिती बंद होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या कालावधीत छापे टाकत बेकायदा दारू निर्मितीचे अड्डे उद्ध्वस्त केले. तसेच केंद्रशासित प्रदेशांमधून होणाऱ्या बेकायदा मद्यवाहतुकीलाही ‘ब्रेक’ लावला.
गुजरातची सीमा जिल्ह्याला लागून असल्याने दीव-दमण, दादरा नगर हवेली यांसारख्या केंद्रशासित प्रदेशातील दारू कर चुकवून राजरोसपणे जिल्ह्यातून चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात होती. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सातत्याने कारवाई केली जात होती. मात्र अल्प मनुष्यबळामुळे या विभागापुढेही मर्यादा येत होत्या. नाशिकच्या उत्पादन शुल्क विभाग गेल्या वर्षी २०२०साली कारवाईत मागे पडल्याचे आकडेवारी वरून दिसून येते. २०१९ सालाच्या तुलनेत सुमारे १६ लाखांनी महसुलाच्या कारवाईत घसरण झाली आहे.
गेल्या वर्षी ठिकठिकाणी छापे टाकून २१४० गुन्हे दाखल करून ७६० जणांना बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल १ हजार ३९१ गुन्ह्यात भरारी पथकांची चाहूल लागताच संशयित गुन्हेगार पसार झाले आहेत.
-----इन्फो----
१० हजार लीटर गावठी तर १७ हजार लीटर देशी दारूचा साठा जप्त
जानेवारी ते डिसेंबर या काळात या विभागाने धडक मोहीम राबवून हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. दहा हजार ८७० लीटर गावठी दारू जप्त केली. तर वारस आणि बेवारस गुन्ह्यांमध्ये सुमारे ५० लाख ७ हजार ८२९ लीटर रसायन हस्तगत केले. यापाठोपाठ देशी दारूचा १७ हजार ४१९.३ बल्क लीटर, तसेच विदेशी दारूचा ५०९.१८ बल्क लीटर, आणि बिअरचा २५५.४५ बल्क लीटर साठा हस्तगत करण्यास यश मिळविले आहे.
---------
१० हजार लीटर प्रतिबंधित मद्यसाठा जप्त
राज्यात विक्रीसाठी बंदी असलेल्या केंद्रशासित प्रदेशात निर्मिती झालेला १० हजार ८४२.९ बल्क लीटर इतका दारूचा साठा गेल्या वर्षभरात जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत १ हजार ४६७ लीटर ताडीदेखील हस्तगत करण्यात आली आहे. वर्षभराच्या कारवाईत ७९ लाख १९ हजार ५०० रुपये किमतीची ५८ वाहने जप्त करण्यात आली आहेत. याबरोबरच अन्य साहित्यही हस्तगत करण्यात आली असून वर्ष अखेर तब्बल ३ कोटी ८६ लाख १९ हजार ९९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.