उद्योगात यशप्राप्तीसाठी आत्मविश्वासाची गरज हनुमंत गायकवाड : विवेक युवा विचार सप्ताहात उद्योग व्यवसायाविषयी मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 12:26 AM2018-01-13T00:26:09+5:302018-01-13T00:27:08+5:30
नाशिक : भारतीय उद्योगांचे जागतिकीकरण करून जागतिक स्तरावर भारतीय तरुणांना उद्योग व्यवसायासाठी पाठबळ उभे करण्याच्या उद्देशाने सरकारकडून जागतिक उद्योग धोरण अस्तित्वात येणार आहे.
नाशिक : भारतीय उद्योगांचे जागतिकीकरण करून जागतिक स्तरावर भारतीय तरुणांना उद्योग व्यवसायासाठी पाठबळ उभे करण्याच्या उद्देशाने सरकारकडून जागतिक उद्योग धोरण अस्तित्वात येणार आहे. त्या माध्यमातून येथील तरुणांना उद्योग व्यवसायाच्या प्रचंड संधी निर्माण होणार असून, उद्योग व्यवसायात योग्य संधी ओळखून यश प्राप्त करण्यासाठी प्रत्येकाने आपल्यातील अंतर्गत प्रामाणिकता आणि आत्मविश्वास जागृत ठेवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भारत विकास ग्रुपचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक हनुमंत गायकवाड यांनी केले. नाशिक विवेक वाहिनीतर्फे मराठा विद्या प्रसारक समाजाच्या इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटर येथे राष्ट्रीय युवा दिन तथा स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित विवेक विचार सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी ‘स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत : संधी आणि आव्हाने’ या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर कृषी उद्योजक विलास शिंदे, पीयूष सोमाणी, डॉ. सुनील ढिकले, सचिन पिंगळे, कोंडाजी आव्हाड आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सुरेश नखाते यांनी, तर सूत्रसंचालन पल्लवी चिंचवडे यांनी केले. गायकवाड म्हणाले, भारत विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरुवात केलेल्या कामाला आज भारत विकास ग्रुपच्या माध्यमातून जागतिक स्तरावर पोहोचविण्यात यश प्राप्त झाले, त्यामागे या समूहात काम करणाºया सर्वांचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आगामी काळात भारत विकासाचीच कल्पना घेऊन हाउसकीपिंगसोबत आरोग्य, संरक्षण, कृषी क्षेत्रात भारत विकास ग्रुपचे काम आमूलाग्र बदल घडविणारे ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारत विकासाची संकल्पना आणि सतत झुंजण्याची तयारी ठेवून सातत्याने काम केल्यामुळे आतापर्यंत यश संपादन करणे शक्य झाले आहे. त्याचप्रमाणे तरुण पिढीतील तरुणांनी त्यांच्या संकल्पना निश्चित करून आत्मविश्वासाने यशप्राप्तीसाठी झुंजण्याची तयारी करण्याची गरज आहे. अपयशाने अथवा अन्याय, अपमानाने खचून न जाता कोणत्याही समस्येवर आत्मविश्वासाने काम करण्याच्या विचाराने मात करता येणे शक्य असल्याचे सांगत त्यांनी तरुणांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात उद्योग व्यवसाय करण्याचा सल्ला दिला.
‘इतरांना दोष देण्यापेक्षा स्वत:ला सिद्ध करा’
यंत्रणेत अनेक दोष असतात. त्यांचा अनेकदा अडसरही निर्माण होतो; परंतु प्रामाणिकता आणि आत्मविश्वासाने ध्येयाकडे वाटचाल केली तर यशप्राप्ती निश्चित मिळते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीसाठी इतरांनी काय केले अथवा इतरांमुळे आपले काम होऊ शकले नाही असे म्हणून इतरांना दोष देण्यापेक्षा तरुणांनी स्वत:ला सिद्ध करण्याची गरज असल्याचे मत हनुमंत गायकवाड यांनी विवेक विचार सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.