वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:11 AM2021-07-15T04:11:31+5:302021-07-15T04:11:31+5:30
जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी आराई, नवी शेमळी परिसरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण ...
जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी आराई, नवी शेमळी परिसरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण असून, पूर्वीप्रमाणेच ही गावे आराई गावठाणाला जोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पावसाच्या थोड्या सरी कोसळल्या तर लगेच विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये विद्युत महामंडळाबद्दल रोष निर्माण होत आहे. परिसरात अजून दमदार पाऊस नसल्यामुळे नागरिक उकाड्यापासून त्रस्त आहेत. विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे अनेक ऑनलाइन कामांनादेखील अडचण निर्माण होत आहे. हा विद्युत पुरवठा सात ते आठ गावांना जोडल्यापासून जास्त खंडित होत असल्याचा परिसरातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पूर्वी आराई, जुनी शेमळी, नवी शेमळी या तीन गाव आर आणि गावठाणला होते. त्याच पद्धतीने विद्युत पुरवठा करून तिन्ही गावांची होणारी गैरसोय विद्युत महामंडळाने लवकरच दूर करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
------------------
जुनी शेमळी परिसरात बऱ्याच दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून, आराई गावठाणला आठ गाव जोडले आहेत. या गावांमधील कोणत्याही एका गावात विजेची तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास सर्व गावांचा वीजपुरवठा खंडित होतो. या विषयावर मार्ग निघाला नाही, तर वीज महामंडळाचे वीजबिल न भरण्याचा निर्णय सर्व ग्रामस्थ मिळून घेऊ.
- अमोल बच्छाव, माजी सरपंच, जुनी शेमळी