भगूरमध्ये हर्षवर्धन यांचे जल्लोषात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 01:57 AM2020-01-13T01:57:25+5:302020-01-13T01:58:07+5:30
महाराष्टÑ केसरीची गदा पटकाविल्यानंतर बलकवडे व्यायामशाळेचा पहिलवान हर्षवर्धन सदगीर यांचे रविवारी भगूरला आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी, पुष्पवृष्टी, ठिकठिकाणी औक्षण आणि सजविलेल्या रथातून संपूर्ण भगूर भूमीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भगूरकरांच्या वतीने हर्षवर्धनचा यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
भगूर : महाराष्टÑ केसरीची गदा पटकाविल्यानंतर बलकवडे व्यायामशाळेचा पहिलवान हर्षवर्धन सदगीर यांचे रविवारी भगूरला आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी, पुष्पवृष्टी, ठिकठिकाणी औक्षण आणि सजविलेल्या रथातून संपूर्ण भगूर भूमीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भगूरकरांच्या वतीने हर्षवर्धनचा यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर प्रथमच भगूरमध्ये आलेल्या हर्षवधन यांचे स्वागत करण्यात आले. भगूर बलकवडे व्यायामशाळेत हर्षवर्धन यांच्या हस्ते कुस्ती मॅट व मानाच्या चांदीच्या गदेचे पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामविकास मंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्षा प्रेरणा बलकवडे, राष्ट्रीय कोच अॅड. विशाल बलकवडे यांनी देखील पूजन केले. सायंकाळी गावातून सजविलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात आली. रथावर गोरखनाथ बलकवडे, हर्षवर्धनचे वडील मुकुंद सदगीर हे उपस्थित होते. बलकवडे व्यायामशाळेपासून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी सुवासिनींनी औक्षण केले.
शिवाजी चौकात आयोजित नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी आमदार सरोज आहिरे, हिरामण खोसकर, सीमा हिरे, गिरीश पालवे, दीपक बलकवडे, प्रदेश कॉँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर गायकवाड, विष्णुपंत म्हेसधुने, कावेरी कासार, राजेंद्र लोणारी आदी मान्यवर उपस्थित होते. केसरी स्पर्धेत विविध गटात पदक मिळविणारे सागर बर्डे, रमेश कुकडे, धर्मा शिंदे, भाऊराव सदगीर आदींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी मान्यवरांची भाषणे झाली.
प्रास्ताविक प्राध्यापक रवींद्र मोरे यांनी केले. १९९५ मध्ये राजेंद्र लोणारी उपमहाराष्ट्र केसरी मल्ल केसरी झाला होता. मात्र हर्षवर्धनच्या रूपाने जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीचा गदा मिळाली, असे सांगितले. सूत्रसंचालन प्रशांत कापसे यांनी केले तर आभार प्रेरणा बलकवडे यांनी मानले. या सोहळ्याला हर्षवर्धन यांचे आई-वडील उपस्थित होते.
सन्मानाने भारावला !
महाराष्टÑ केसरीच्या विजेतेपदाचा सन्मान नाशिकला प्रथमच मिळवून देणाऱ्या हर्षवर्धन यांच्या स्वागतासाठी भगूरच जणू रस्त्यावर उतरले होते. ढोल-ताशाच्या गजरात रथावरील मिरवणुकीनंतर हर्षवर्धन यांनी बलकवडे व्यायाम शाळेतील हनुमानाच्या मूर्तीस नमस्कार केला़ यावेळी ते अक्षरश: भारावून गेले होता.
रथातून उतरून आई-वडिलांना नमस्कार
हर्षवर्धन यांच्या आगमनानंतर बलकवडे व्यायामशाळेपासून मिरवणुकीस प्रारंभ झाला. हर्षवर्धनचे आई-वडील आणि आत्या आल्याचे दिसताच हर्षवर्धनने रथातून खाली उतरून ज्येष्ठांचा वाकून नमस्कार करीत आशीर्वाद घेतले. त्यावेळी आई-वडिलांनी अभिमानाने हर्षवर्धनला आलिंगन दिले.
महाराष्टÑ केसरी हर्षवर्धन यांची लाडूने तुला !
भगूरमध्ये हाती मानाची चांदीची गदा देऊन महाराष्टÑ केसरीचा पुन्हा एकदा सन्मान करण्यात आला. त्यानंतर हर्षवर्धन यांची विहीतगाव येथे लाडूने तुला करण्यात आली. हे लाडू मित्रपरिवाराने एकमेकांना भरवून उपस्थित शेकडो एकमेकांना वाटले.
पुरस्काराबाबत कुतूहल
महाराष्टÑ केसरीला दिली जाणारी मानाची चांदीची गदा प्रथमच सर्व भगूरकरांना याचि देही याचि डोळा बघायला मिळाल्याने त्या गदेबाबत कुतूहल असल्याचे दिसून येत होते. हर्षवर्धनसमवेत कुस्तीगीर मित्र, बलकवडे व्यायामशाळेतील बालकुस्तीपटू, महिला कुस्तीपटू तसेच भगूरकर असे सर्वच हर्षवर्धनशी हस्तांदोलन करत होते.