हात-पाय बांधून मृतदेह प्लास्टिकच्या गोणीत भरून विहिरीत फेकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2022 12:25 AM2022-05-25T00:25:19+5:302022-05-25T00:25:19+5:30
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील मानोरी शिवारात सुमारे ४० ते ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह हातपाय बांधून प्लास्टिकच्या गोणीत भरून विहिरीत फेकून दिल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेहाची रात्री उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती. सदर प्रकार घातपाताचा असण्याची शक्यता असून, मृतदेहाची ओळख पटल्यानंतरच तपासाला अधिक दिशा मिळू शकेल.
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील मानोरी शिवारात सुमारे ४० ते ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह हातपाय बांधून प्लास्टिकच्या गोणीत भरून विहिरीत फेकून दिल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेहाची रात्री उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती. सदर प्रकार घातपाताचा असण्याची शक्यता असून, मृतदेहाची ओळख पटल्यानंतरच तपासाला अधिक दिशा मिळू शकेल.
वावी- नांदूरशिंगोटे रस्त्यापासून काही अंतरावर मानोरी शिवारात गट नंबर २३८ मध्ये चांगदेव कर्डेल यांची शेती आहे. दुपारी एक वाजेच्या सुमारास कर्डेल मजुरांसोबत शेतात शेणखत पसरविण्याचे काम करत होते. यावेळी त्यांच्या मालकीच्या विहिरीतून दुर्गंधी येत असल्याने त्यांनी विहिरीत डोकावले. विहिरीतील पाण्यावर तरंगणाऱ्या प्लास्टिक गोणीतून माणसाचा पाय बाहेर दिसत असल्याचे दिसले. त्यांनी घटनेची माहिती नांदूरशिंगोटे पोलीस दूरक्षेत्रात दिली. घटनेचे गांभीर्य पाहून वावीचे सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते, उपनिरीक्षक विजय सोनवणे, प्रकाश गवळी, सहायक उपनिरीक्षक प्रवीण अढांगळे यांच्यासह पोलीस पथक तातडीने मानोरी शिवारात दाखल झाले. विहिरीत तरंगणारा मृतदेह कुजल्यामुळे दुर्गंधी येत होती. सहायक निरीक्षक कोते यांनी वरिष्ठांना माहिती देत दोडी येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले. स्थानिकांच्या मदतीने विहिरीत खाट सोडून मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह बाहेर काढण्याच्या प्रयत्नात प्लास्टिक गोणी फाटल्याने मृतदेहाचे दोन्ही हात व पाय नायलॉन दोरीने बांधले असल्याचे दिसून आले. मृताच्या अंगावर अंडरवेअर वगळता एकही कपडा नव्हता. मृतदेह नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. सुमारे १७० सेंटिमीटर उंची व मध्यम बांध्याचा पुरुष जातीचा सदर मृतदेह असून, त्याचे वय अंदाजे ४० ते ४५ दरम्यान असावे. मृताच्या अंगावर रूपा जोन कंपनीची ९५ नंबरची चॉकलेटी रंगाची अंडरवेअर असून, डाव्या पायाला टाचेजवळ जुनी जखम आहे. त्याठिकाणी कापडी बँडेज बांधलेले आढळले. अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, मन्मदचे उपविभागीय पोलीस अधिकारी समरसिंग साळवे यांनी भेट देऊन पोलिसांना तपासकामी सूचना केल्या. चार ते पाच दिवसांपूर्वी मृतदेह विहिरीत टाकला असावा, असा अंदाज आहे. परिसरातून सदर वर्णनाची व्यक्ती बेपत्ता असल्यास वावी पोलिसांसोबत संपर्क साधण्याचे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांनी केले आहे.