नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १०) एकूण ११५ रुग्ण कोरोनामुक्त, तर १२१ नागरिकांना नव्याने कोरोना झाला आहे. बाधितांची संख्या कोरोनामुक्तच्या तुलनेत अधिक असल्याने एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या ९०४ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात नव्याने बाधित झालेल्या ११५ नागरिकांमध्ये ८५ नाशिक ग्रामीणचे, २६ नाशिक मनपाचे, ३ मालेगाव मनपाचे, तर जिल्हाबाह्य ७ नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यात नाशिक ग्रामीणला एका नागरिकाचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८६०२ वर पोहोचली आहे. दरम्यान, प्रलंबित अहवालांच्या संख्येत अल्पशी घट येऊन ही संख्या ४३५ वर पोहोचली आहे, तर जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांची सरासरी ९७.६६ टक्क्यांवर पोहोचली आहे. गत महिन्यात एकूण उपचारार्थी संख्या एक हजाराखाली आली, तर सप्टेंबर महिन्यात पहिल्या आठवड्याच्या समाप्तीनंतर उपचारार्थी रुग्णसंख्या ९०० च्या खाली आली होती. मात्र, शुक्रवारी ही संख्या पुन्हा नऊशेवर गेल्याचे दिसत आहे.