आरोग्य महाकुंभाला सेवाभावी संस्थांची मदत
By admin | Published: December 31, 2016 01:07 AM2016-12-31T01:07:03+5:302016-12-31T01:07:18+5:30
गिरीश महाजन : महाआरोग्य शिबिराची तयारी अंतिम टप्प्यात
नाशिक : जिल्ह्यातील विविध भागांतील रुग्णांना सर्वोत्तम आरोग्य सेवा मिळावी व विविधा विकारांपासून जनसामान्यांची सुटका व्हावी या हेतूने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर आरोग्य सप्ताह राबविण्यात येत असून, त्यानंतर रविवारी (दि.१) गोल्फ क्लब मैदानावर महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, विविध सेवाभावी संस्था आणि उद्योजकांच्या मदतीने हा आरोग्याचा महाकुंभ यशस्वी होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. गोल्फ क्लब मैदानावर महाआरोग्य शिबिराची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, पालकमंत्र्यांनी शुक्रवारी संध्याकाळी शिबिराच्या नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संवाद साधला. महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य शिबिरामध्ये विविध स्थानिक खासगी व शासकीय रुग्णालयांसह वैद्यकीय महाविद्यालयातील एक हजार डॉक्टर रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहे. तसेच मुंबई, पुणे, कोलकाता, दिल्ली, बंगळुरू सांरख्या शहरातून राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुमारे साडेचारशे डॉक्टरही या शिबिरामध्ये सहभागी होणार आहेत. यात ६ ते ७ पद्मश्री पुरस्कार डॉक्टरांचा समावेश आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून ७० ते ८० हजार रुग्णांना वैद्यकीय सुविधा मिळणार असून, यात रुग्णांच्या तपासणीपासून उपचार आणि गरज असल्यास शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहेत. शस्त्रक्रिया कराव्या लागणाऱ्या रुग्णांना महिनाभरात गरजेनुसार नाशिकसह पुणे, मुंबईमध्येही शस्त्रक्रियेची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे महाजन यांनी सांगितले. दरम्यान, रुग्णांच्या वाहतुकीसाठी ५०० वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे.
(प्रतिनिधी)