कसबे सुकेणे : तत्काळ उपचारांअभावी राज्यातील आदिवासी दुर्गम भागातील रुग्णांना कधी कधी जीव गमवावा लागतो. तशा घटनाही घडल्या आहेत. परंतु नाशिक कुंभमेळ्याच्या निमित्ताने देण्यात येणाऱ्या आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणामुळे आता दुर्गम भागातील आरोग्यसेविकांसह कर्मचारी सीपीआरसारख्या तातडीच्या वैद्यकीय मदतीसाठी सज्ज झाले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आरोग्य सेवा विभागाच्या कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे अद्ययावत प्रशिक्षण मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात देण्यात आले. विभागातील नाशिकसह धुळे, जळगाव आणि नंदुरबार येथील ग्रामीण, शहरी व विशेषत: आदिवासी भागातील आरोग्य कर्मचारी व सेवकांना हे प्रशिक्षण दिल्याने कुंभमेळ्याच्या व्यतिरिक्त त्या त्या भागातील आरोग्यसेवेला प्रशिक्षित मनुष्यबळ लाभणार आहे. आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या हस्ते या प्रशिक्षणाचा प्रारंभ झाला तर समारोपाला अमेरिकेतील युनिव्हसर््िाटी आॅफ फ्लोरिंडा येथील इमर्जन्सी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सागर गळवणकर यांनी भेट देऊन संवाद साधला. प्रारंभी अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील यांनी डॉ. सागर गळवणकर यांचे स्वागत केले. समन्वयक डॉ. प्रदीप बर्डे यांनी प्रास्ताविक केले. एप्रिल महिन्यात मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सीडीसी अटक्लांटा व इंडसईम यांच्या सहयोगातून तीन स्तरावर आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा झाली होती. याचाच पुढचा टप्पा म्हणून सुरू असलेले विविध स्तरावरील प्रशिक्षणाचा आढावा डॉ. गळवणकर यांनी घेतला. तत्पूर्वी त्यांनी महाविद्यालयातील विविध विभागांच्या प्रमुखांशी संवाद साधला.यावेळी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील यांनी महाविद्यालयाची माहिती दिली. याप्रसंगी डॉ. प्रीती बजाज, डॉ. जितेंद्र सिंग आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
आरोग्यसेविकाही देणार सीपीआर
By admin | Published: August 04, 2015 11:30 PM