सुनावणी : नाशिकच्या सोमेश्वर देवस्थानचे दप्तर जमा करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 01:29 PM2017-11-29T13:29:36+5:302017-11-29T13:38:02+5:30
यासंदर्भात नव्या ट्रस्टींनी सहायक धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी मुरलीधर पाटील यांना निर्देश दिल्यानंतरही त्यांनी दखल घेतली नाही.
नाशिक : सोमेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये नवनियुक्त ट्रस्टी तसेच पदाधिकारी आणि माजी अध्यक्षांचा वाद सुरूच असून, या प्रकरणी मंगळवारी (दि. २८) सहायक धर्मादाय आयुक्तांकडे झालेल्या सुनावणीनंतर मुरलीधर पाटील यांना येत्या ४ डिसेंबरला धर्मादाय आयुक्त कार्यालयात दप्तर जमा करण्याचे आदेश सहायक धर्मादाय आयुक्तांनी दिले. पाटील यांनी मात्र अशा प्रकारचे कोणतेही आदेश दिले नसल्याचा दावा केला असून, पुढील सुनावणीची तारीख देण्यात आल्याचे सांगितले.
सोमेश्वर देवस्थानवर नवीन ट्रस्टी नियुक्त करण्यात आले आणि त्यातून अध्यक्ष तसेच अन्य पदाधिका-यांची निवड झाली. मात्र मावळते अध्यक्ष मुरलीधर पाटील नव्या ट्रस्टींना दाद देत नसून त्यांनी आॅफिस तसेच दप्तराचा ताबा दिलेला नाही. यासंदर्भात नव्या ट्रस्टींनी सहायक धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी मुरलीधर पाटील यांना निर्देश दिल्यानंतरही त्यांनी दखल घेतली नाही. उलट २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता बैठक बोलावून नव्या विश्वस्तांना कार्यभार देण्याचे पत्र स्वत: अध्यक्ष असल्याच्या नात्याने दिले आणि तेथे बैठकीत कार्यभार तर दिला नाहीच उलट गुंड प्रवृत्तीचे लोक आणून धमकावल्याची तक्रार नव्या ट्रस्टींमधील अध्यक्ष प्रमोद गो-हे, सरचिटणीस बापूसाहेब तिवारी, खजिनदार गोकुळ पाटील, हरिश्चंद्र मोगल, अविनाश पाटील, राहुल बर्वे व श्यामसिंग परदेशी यांनी पोलीस आयुक्त तसेच सहायक धर्मादाय आयुक्तांकडे केली होती. त्या आधारे मंगळवारी सहायक धर्मादाय आयुक्तांकडे सुनावणी झाली.