सागर चौधरीच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

By Admin | Published: October 25, 2015 11:41 PM2015-10-25T23:41:46+5:302015-10-25T23:42:18+5:30

सादरे आत्महत्त्या : सागर चौधरीची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची

Hearing on Sagar Chaudhary's anticipatory bail today | सागर चौधरीच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

सागर चौधरीच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

googlenewsNext

नाशिक : जळगाव येथील रामानंदनगर पोलीस ठाण्याचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्त्या प्रकरणातील संशयित वाळू ठेकेदार सागर मोतीलाल चौधरी यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी (दि़२६) जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ आऱ कदम यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे़ दरम्यान, या गुन्ह्यातील अन्य संशयित पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर व प्रभाकर रायते यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केलेला नाही़
निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी शुक्रवारी (दि़१६) सायंकाळी आडगाव येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केली़ तत्पूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत वरिष्ठांकडून कलेक्शन, दिवाळी गिफ्टची मागणी म्हणून ‘सोने’ तसेच वाळू ठेकेदार सागर चौधरीच्या दबावावरून खोट्या गुन्ह्यात अडकविले़ वरिष्ठांच्या या सततच्या त्रासामुळेच आत्महत्त्या करीत असल्याचे चिठ्ठीत लिहून ठेवले होते़
सादरे यांच्या आत्महत्त्येनंतर दुसऱ्या दिवशी त्यांची पत्नी माधुरी सादरे यांच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात जळगावचे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ़ जालिंदर सुपेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते व वाळू ठेकेदार सागर मोतीलाल चौधरी (रा़ प्लॉट नंबर १३५, शनी पेठ, चौगुले प्लॉट, जळगाव) यांच्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला़
संशयित चौधरीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी अ‍ॅड. बिपिन पांडे यांच्यामार्फत मंगळवारी (दि़२०) अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला़ या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे़
वेगळा न्याय का?
आत्महत्या करणाऱ्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये ज्यांची नावे असतात त्यांना पोलीस लागलीच अटक करतात. मग या प्रकरणात पोलीस अधीक्षक सुपेकर, निरीक्षक रायते व वाळू माफिया सागरचे नाव आहे. त्यांना मात्र अटक झालेली नाही. इतर आरोपींना वेगळा व अधिकारी, माफियांना वेगळा न्याय कसा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या चौधरी यावर तडीपारीची कारवाई झाली होती. मात्र प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी न झाल्याने त्यास राजकीय वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे.
उद्या त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होत असल्याने याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)

विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

सागर चौधरी याची पार्श्‍वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. अधिकार्‍यांना धमकावणे, खोट्या गुन्ह्यात अडकविणे, राजकीय दबावाचा वापर करणे असे प्रकार त्याने केले आहेत. जळगावच्या विविध पोलीस ठाण्यात सागर चौधरी याच्या विरोधात विविध प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत.

Web Title: Hearing on Sagar Chaudhary's anticipatory bail today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.