मालेगाव परिसरात उन्हाचा तडाखा, पारा ४३ अंशावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2022 11:39 PM2022-04-03T23:39:25+5:302022-04-03T23:41:08+5:30
मालेगाव : शहर परिसरावर दिवसेंदिवस सूर्य आग ओकू लागला असून एप्रिल महिन्याच्या प्रारंभीच तापमानाचा पारा ४३ अंशावर पोहोचल्याने नागरिकांना उकाड्याने होरपळून काढले आहे.
मालेगाव : शहर परिसरावर दिवसेंदिवस सूर्य आग ओकू लागला असून एप्रिल महिन्याच्या प्रारंभीच तापमानाचा पारा ४३ अंशावर पोहोचल्याने नागरिकांना उकाड्याने होरपळून काढले आहे.
गेल्या शुक्रवारी किमान २० आणि कमाल ४३ अंश असणाऱ्या तपमानात गेल्या दोन दिवसात आणखी वाढ झाली असून शनिवारी (दि. २) किमान २०.२ आणि कमाल ४३.२ अंश तापमान नोंदवले गेले होते. रविवारीही तापमान ४३ अंशावर गेले मात्र काहीसे ढगाळ वातावरण होते . असह्य उकाड्यामुळे नागरिकांना कुलर आणि पंख्यांचा आधार घ्यावा लागत आहे. उष्णतेच्या विकारांनी नागरिकांना ग्रासले आहे. गरिबांचा फ्रीज समजला जाणाऱ्या माठ खरेदीला गर्दी होऊ लागली आहे. भरदिवसा लोक उन्हामुळे घराबाहेर निघणे टाळत असल्यामुळे नेहमी भरभरून वाहणारे रस्ते अघोषित संचारबंदी जारी झाल्याप्रमाणे निर्मनुष्य दिसत आहेत.
भरदिवसा घामाच्या धारा वाहत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. रस्त्यावर लोक सावलीचा आधार शोधत असून ठिकठिकाणी विक्रीसाठी असलेल्या लिंबू सरबत आणि शीतपेयांमुळे काहीसा दिलासा मिळत आहे. परिसरात दरवर्षी ४६ अंशापर्यंत तापमान वाढत जाते मात्र यंदा वेधशाळेने तापमान वाढीचा इशारा दिल्याने काळजी वाढली आहे.