नाशिक : शहर व परिसरात मध्यरात्री सुमारे अर्धा ते पाऊणतास जोरदार पाऊस झाला. या पावसाने भद्रकाली परिसरातील एक जुने जीर्ण झालेले दुमजली घर ओलेचिंब झाले. पहाटे सुमारे साडेचार वाजेच्या सुमारास घर अक्षरक्ष: पत्त्याच्या इमल्याप्रमाणे कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटने घरात भाडेकरू म्हणून राहणारा २२ वर्षीय राजेंद्र बोरसे या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर एक वृध्द या दुर्घटनेत सुदैवाने बचावले. अग्निशमन दलाचे रेस्क्यू पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने जवानांनी त्वरित वृध्दाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मलबा बाजूला करत त्याला बाहेर काढले आणि रूग्णवाहिकेतून जिल्हा रूग्णालयात रवाना केले.याबाबत अधिक माहिती अशी, भद्रकाली भाजी बाजाराच्या परिसरात असलेल्या टॅक्सी स्थानकच्या पाठीमागे मातंगवाडी म्हणून लोकवस्ती आहे. या ठिकाणी बागुल यांचे दुुमजले घर होते. अत्यंत जीर्ण झालेल्या या घराची भींत पहाटेच्या सुमारास ढासळली आणि दगड विटांचा खच पडला. या दुर्घटनेत बोरसे याचा जागीच मृत्यू झाला तर अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे वृध्दाचे प्राण वाचले. राजू खराटे (५८) व सुनील बागुल हे दोघे जखमी झाले आहे. बागुल यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत तर खराटे यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू तर दोघे जखमी झाल्याची माहिती अग्निशमन दल व पोलिसांनी दिली. या घराला लागून असलेल्या एका जीर्ण घराची भींत या लहान घरावर कोसळल्याने दुर्घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन मुख्यालयातील एक बंब व कोणार्कनगर नाशिक विभागीय कार्यालयातील एक बंबासह जवान काही मिनिटांतच घटनास्थळी पोहचले. लिडिंग फायरमन श्याम राऊत, बंबचालक गणेश गायधनी, फायरमन राजेंद्र पवार, किशोर पाटील, उदय शिर्के, विजय शिंदे यांनी मदतकार्य केले. यावेळी मलबा अधिक असल्यामुळे तत्काळ हॅजमेट वाहनालाही पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या तीन बंबांसह जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून तत्काळ मलब्याखाली अडकलेल्या एका वृध्दाला बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले; मात्र दुर्दैवाने डोक्याला व छातीला मलब्याचा गंभीर मार लागल्याने युवकाचा मृत्यू झाला. पहाटेपासून सकाळी आठ वाजेपर्यंत मलबा हटवित मदतकार्य सुरू होते.
मध्यरात्री जोरदार पाऊस : भद्रकालीत जीर्ण झालेले दुमजली घर कोसळले; एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 10:34 AM
अग्निशमन दलाचे रेस्क्यू पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने जवानांनी त्वरित वृध्दाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मलबा बाजूला करत त्याला बाहेर काढले
ठळक मुद्देएका जीर्ण घराची भींत या लहान घरावर कोसळल्याने दुर्घटनाया दुर्घटनेत एकाचा मृत्यू तर दोघे जखमी