नैसर्गिक आपत्तीतील मृतांच्या नातेवाईकांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:18 AM2021-09-14T04:18:42+5:302021-09-14T04:18:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू ओढावलेल्या मृतांच्या नातेवाईकांना शासनाच्या नियमाप्रमाणे आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू ओढावलेल्या मृतांच्या नातेवाईकांना शासनाच्या नियमाप्रमाणे आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात नैसर्गिक आपत्ती ओढावल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. पुरात वाहून गेलेल्यांना तसेच वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना मदतीचा हात देण्यात आला.
चालू वर्षात नैसर्गिक आपत्तीत ११ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. त्यानुसार सहाजणांचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला तर तिघांचा पुरात वाहून तर एकाचा अंगावर भिंत कोसळून मृत्यू झाला. त्यापैकी सात दावे पात्र ठरले असून, मृताच्या नातेवाईकांना शासनाच्या नियमाप्रमाणे जीवितासाठी देण्यात येणारी प्रत्येकी चार लाखांची मदत देण्यात आली. या प्रकरणांत वर्षभरात एकूण २८ लाखांची मदत देण्यात आली आहे.
मागीलवर्षी जिल्ह्यात पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तींमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये अनेकांची आर्थिक व जीवितहानी झाली आहे. वादळी वारा तसेच मुसळधार पाऊस आणि वीज पडून होणाऱ्या दुर्घटनेत काहींना आपले प्राण गमवावे लागले. चालू वर्षात विध्वंसक असा पाऊस झाला नसला, तरी मध्यंतरी नैसर्गिक आपत्तीत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात सहाजणांचा अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू झाला. त्यापैकी येवला व सिन्नर तालुक्यात दोन तर निफाड व इगतपुरी तालुक्यातील एका घटनेचा समावेश आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात तीनजण पुरात वाहून गेल्याची घटना घडली आहे. मालेगाव व देवळ्यात अंगावर भिंत कोसळून दोघांना जीव गमवावा लागला. शासकीय आदेशानुसार, पुरात वाहून अथवा वीज अंगावर पडून मृत्यू झाल्यास त्यांच्या परिवार अथवा नातेवाईकांना प्रत्येकी चार लाखांची आर्थिक मदत दिली जाते. या ११ घटनांपैकी सात प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली असून, प्रत्येकी चार लाख याप्रमाणे २८ लाखांची मदत जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सातपैकी सहा प्रकरणे वीज कोसळून मृत्यू झालेल्यांची असून, एक प्रकरण पुरात वाहून गेलेल्याचे आहे.