ईडीच्या कार्यालयाकडून सहा वर्षांनंतर या प्रकरणात पुन्हा फास आवळला गेल्याने बहुचर्चित धान्य घोटाळ्याची नव्याने चर्चा होऊ लागली आहे. या धान्य घोटाळ्यातील वाहतूक ठेकेदारांवर कारवाई झाल्याने अन्य पडद्यामागील घटकदेखील हादरले आहेत. ‘ईडी’च्या जाळ्यात आता यापुढे या प्रकरणात आणखी कोण कोण अडकतात याकडे आता लक्ष लागून आहे. तिघा घोरपडे बंधूंची नागपूर येथील कार्यालयात कसून चौकशी करण्यात आली. चौकशीअंती तिघांनी कोट्यवधींचा अपहार केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर ‘मनी लॉन्ड्रिंग’चा ठपका ठेवण्यात आला. तिघांनी सकारात्मक उत्तरे चौकशीदरम्यान दिली नसल्याने ईडीच्या तपासी पथकाने त्यांना अटक केली.
सक्तवसुली संचालनालयाच्या नागपूर कार्यालयाकडून रेशन धान्य घोटाळ्यात घोरपडे बंधूंना अटक करण्यात आली आहे. यामुळे सहा वर्षांपूर्वी थेट विधानसभेत गाजलेला नाशिकचा रेशन धान्य काळ्याबाजाराचा घोटाळा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या घोटाळ्यात वाहतूक ठेकेदार संशयित संपत नामदेव घोरपडे, अरुण नामदेव घोरपडे आणि विश्वास नामदेव घोरपडे यांच्यावर गुन्ह्याची व्याप्ती राज्यासह परराज्यातसुद्धा पोहचल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाईदेखील केली होती. पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशान्वये यांची पाच कोटींची मालमत्ता जप्त केली होती. त्यानंतर फरार घोरपडे बंधू पोलिसांना शरण आले होते. सहा महिने मध्यवर्ती कारागृहात तुरुंगवास भोगल्यानंतर २०१८साली त्यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.