वणी : कांद्याच्या दरात मागणीप्रमाणे बदल होत असून, वणी उपबाजारात गुरुवारी (दि. ३) उन्हाळ कांद्याच्या तुलनेत लाल कांद्याला अधिक दर मिळाल्याने कांदा व्यवहाराचे गणित बदलले आहे.
वणी उपबाजारात गुरुवारी (दि. ३) तीन हजार ८५० क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यात २१०० क्विंटल उन्हाळ, तर १७५० क्विंटल लाल कांदा अशी वर्गवारी होती. १९४ वाहनांमधून उत्पादकांनी विक्रीसाठी कांदा उपबाजारात आणला होता. उन्हाळ कांद्याचे कमाल २८६६, किमान १५००, तर सरासरी २१२५ प्रतिक्विंटल अशा दराने खरेदी-विक्री व्यवहार पार पडले. लाल कांद्याला कमाल ३४००, किमान १७०० तर सरासरी २५०० रुपये प्रतिक्विंटल असा दर उत्पादकांना मिळाला. उन्हाळ कांदा अजूनही काही उत्पादकांकडे शिल्लक आहे. त्या कांद्याचेही अस्तित्व टिकून आहे. मात्र लाल कांद्यानेही आपला प्रभाव दाखवला असून, उन्हाळ कांद्याच्या तुलनेत दराच्या बाबतीत बाजी मारली आहे.