नाशिक : जिल्ह्यात कोरोनाने सोमवारी नवीन उच्चांक स्थापित करत तब्बल २७७९ पर्यंत मजल मारली. सोमवारी (दि. २२) दिवसभरात बाधित संख्येने पुन्हा अडीच हजाराचा टप्पा ओलांडला असून त्यात नाशिक महापालिका क्षेत्रातील १,५४४ रुग्णांचा समावेश आहे. त्यात तब्बल पाच महिन्यांनंतर बळींची संख्यादेखील दिवसभरात १२ वर गेल्याने यंत्रणादेखील संभ्रमित झाली आहे.
जिल्ह्यात सोमवारी तब्बल २,७७९ बाधित रुग्ण तर २,६९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ३, ग्रामीणला ९ असे एकूण १२ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या २,२३२ वर पोहोचली आहे. गत आठवडाभरापासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने २ हजार आणि अडीच हजारावर राहिल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेसमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यात शुक्रवारी आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे तब्बल २,५०८ बाधितांची नोंद झाली होती. त्यानंतर दोनच दिवसात पुन्हा बाधित संख्येने त्यापेक्षाही खूप मोठा टप्पा गाठल्याने जिल्ह्याची वाटचाल कुठल्या दिशेने सुरू आहे, त्याबाबत जनमानसात चर्चेला उधाण आले आहे.
इन्फाे
नाशिक मनपा क्षेत्रात १,५४४
नाशिक महानगरपालिका क्षेत्रात पुन्हा सर्वाधिक १,५४४ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. महानगरात सलग पाचव्या दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात बाधित आढळल्याने नाशिक महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रसार सर्वाधिक वेगाने होत असल्याचे दिसून येत आहे. मनपा क्षेत्रात आरोग्य यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत असताना आणि नागरिक जागरूक असतानाही कोरोनाबाधितांच्या वेगाने मनपाचा आरोग्य विभागदेखील चक्रावून गेला आहे.
इन्फो
प्रलंबित अहवाल ४,०४६
जिल्ह्यात संशयितांची तपासणी आणि नमुने गोळा होण्याच्या प्रमाणात आठवडाभरात प्रचंड वेगाने वाढ होत आहे. त्यामुळेच प्रलंबित अहवालाची संख्या सातत्याने वाढत असून सोमवारी ही प्रलंबित अहवाल संख्या ४,०४६ वर पोहोचली आहे. बाधितांच्या आकड्यातील सातत्यपूर्ण वाढ आणि अहवाल मिळण्यास मर्यादा असल्याने प्रलंबित संख्या सातत्याने ४ हजारांवरच राहिली आहे.
इन्फो
बळीतील वाढीने चिंता
कोरोना रुग्ण वाढीइतकीच किंबहुना त्यापेक्षाही अधिक गंभीर बाब म्हणजे कोरोना बळींची संख्या सलग दुसऱ्या दिवशी दोन आकडी राहिली आहे. यापूर्वी कोरोनाबळी दहावर राहण्याचे प्रमाण कोरोनाच्या बहराच्या काळात म्हणजे सप्टेंबरमध्येच होते. रविवारी १० तर सोमवारी १२ बळी गेल्याने ही बळींची वाढती संख्या हा अधिक चिंतेचा विषय ठरत आहे.