गोंदे फाटा येथे मास्क न घालणाऱ्यांना दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 11:58 PM2021-04-07T23:58:27+5:302021-04-08T00:53:37+5:30
नांदूरवैद्य : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनस्तरावरून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. ग्रामस्थ मास्क न लावता खुलेआम बाहेर फिरताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील गोंदे फाटा येथे धडक मोहीम राबवत मास्क न वापरणाऱ्या ग्रामस्थांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून, ग्रामस्थांनी आपली काळजी घेण्याचे आवाहन गोंदे दुमाला ग्रामपंचायतीचे सरपंच शरद सोनवणे यांनी केले आहे. परंतु, अनेक ग्रामस्थ विनामास्क बाहेर फिरत असल्यामुळे ग्रामपंचायतीकडून दररोज मास्क न वापरणाऱ्या ग्रामस्थांसाठी विशेष दंडात्मक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत अनेक दुकानदार, व्यावसायिकांवर मास्क न वापरल्याबद्दल दंडात्मक कारवाई करत दंड वसूल करण्यात आला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काही दिवसांपूर्वीच दर शनिवारी भरणारा आठवडा बाजारही सरपंच शरद सोनवणे यांनी बंद केला असून, इतर छोटे-मोठे दुकानदार यांना अत्यावश्यक सेवा वगळता बंद ठेवण्यात आले आहे. मास्क सक्तीच्या अंमलबजावणीसाठी गोंदे गाव ते गोंदे फाटा येथील प्रत्येक दुकानावर जात विनामास्क फिरणाऱ्या ग्रामस्थांवर दंडात्मक कारवाई केली आहे. वाडीव पोलीस स्थानक तसेच गोंदे दुमाला ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ही धडक मोहीम राबविण्यात आली आहे. यावेळी मास्क न वापरणाऱ्या २० ते २५ ग्रामस्थांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, वाडीवऱ्हे पोलीस स्थानकातर्फे मास्क लावूनच बाहेर पडावे, असे आवाहन पोलीस हवालदार बबन सोनवणे तसेच रहिम शेख यांनी केले आहे.