कौटुंबिक वातावरणात घरोघरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:14 AM2021-04-15T04:14:30+5:302021-04-15T04:14:30+5:30

नाशिक : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३०वी जयंती शहर परिसरात अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली. चौकाचौकात अभिवादनाचे फुलक ...

At home in the family environment, Dr. Simply celebrate Babasaheb Ambedkar Jayanti | कौटुंबिक वातावरणात घरोघरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी

कौटुंबिक वातावरणात घरोघरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी

Next

नाशिक : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३०वी जयंती शहर परिसरात अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली. चौकाचौकात अभिवादनाचे फुलक उभारण्यात आले होते, तर विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला होता. घरोघरी सामूहिक बुद्ध वंदना घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यंदा सामूहिक नव्हे तर कौटुंबीक वातावरणात जयंती साजरी करण्यात आली.

मागील वर्षाप्रमाणेच यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीवर कोरोनाचे सावट आले आहे. जयंतीची सर्वत्र जय्यत तयारी सुरू असतानाच राज्यातील कोरोनाच्या कठीण स्थितीमुळे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे जयंती साधेपणाने साजरी करण्याबाबत शासनाने आवाहन केले होते; त्यानुसार या आवाहनाला प्रतिसाद देत समाज बांधवांनी अत्यंत साधेपणाने घरगुती वातावरणात जयंती साजरी केली.

जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वत्र चौकाचौकांमध्ये स्टेज उभारून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणारे फलक लावण्यात आले होते. रस्त्याच्या कडेला निळे ध्वज आणि अभिवादन व्यक्त करणाऱ्या कमानी उभारण्यात आल्याने सर्वत्र जयंती उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. बुधवारी सकाळपासून घराघरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांचे पूजन करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. घरातील सर्वांनी पांढरे वस्त्र परिधान करून प्रतिमेला अभिवादन केले.

सार्वजनिक मित्रमंडळे तसेच जयंती उत्सव समित्यांच्या वतीनेदेखील चौकांमध्ये साधेपणाने जयंती साजरी करण्यात आली. कोठेही गीतांचा आवाज, फटाक्यांची आतषबाजी किंवा वाद्याचा दणदणाट नव्हता. चौकामध्ये ठेवण्यात आलेल्या आंबेडकरांच्या प्रतिमा आणि पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी परिसरातील नागरिक रांगेत उभे राहून अभिवादन करतानाचे चित्र शहरात दिसून आले.

१४ एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने घरोघरी गोडधोड केले जाते. यंदाही कौटुंबीक सोहळ्यात जयंतीचा उत्साह दिसून आला. घरांवर निळे ध्वज लावण्यात आले होते तसेच अंगणात विद्युत रोषणाईही करण्यात आली होती.

शहरातील मुख्य जयंती उत्सवाबरोबरच नाशिक रोड येथील सार्वजनिक जयंती उत्सव तसेच देवळाली कॅम्प, भगूर, सातपूर, सिडको, पंचवटी, अंबड, गंगापूर, मखमलाबाद, सिद्ध पिंपरी या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरी होणारी जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.

Web Title: At home in the family environment, Dr. Simply celebrate Babasaheb Ambedkar Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.