नाशिक : द्वारका येथील मरीमाता मंदिराशेजारी असलेल्या एका बंद घराची खिडकी तोडून घरामध्ये प्रवेश करत तीन लाखांची रोकड व २५ हजारांचे दागिने लांबविणारा चोरटा भद्रकाली पोलिसांनी गजाआड केला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वणी येथे कल्याणी कु टुंबीय देवदर्शनासाठी गेले असता त्यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून दागिने व रोकड लांबविल्याची घटना मागील आठवड्यात शुक्रवारी (दि.१) उघडकीस आली होती. याप्रकरणी दिनेश लक्ष्मण कल्याणी यांच्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घरफोडीचा तपास गुन्हे शोध पथकाने सुरू केला.मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अधारे शालिमार येथे सापळा रचून संशयित रईस सईद शेख (२५,रा. वडाळागाव) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून घरफोडीतील रकमेपैकी एक लाख २० हजार रुपयांची रोकड, त्याच पैशांमधून खरेदी केलेला १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल आणि ७३ हजार ४६४ रुपयांचे दागिने, असा एकूण २ लाख ८ हजार ४६४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शोध पथकाचे निरीक्षक आर. व्ही. हांडे, साजन सोनवणे, उपनिरीक्षक विजयसिंग जोनवाल, सुधीर पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्याच्याकडून घरफोडीचे अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
घरफोड्या करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 11:34 PM