नाशिक : राहुल गांधी यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर विरोधक आनंदोत्सव साजरा करून न्यायालयाचे गुणगान करीत आहेत, याचे मनापासून समाधान वाटते. कारण हेच लोक यापूर्वी न्यायालयाविरुद्ध अपशब्द काढत गरळ ओकत होते, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
नाशिक येथे पोलीस दीक्षांत सोहळ्यानिमित्त शुक्रवारी संध्याकाळपासूनच देवेंद्र फडणवीस नाशकात दाखल झाले होते. शनिवारी (दि.५) सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बाेलत हेाते. निकाल आमच्या बाजूने लागला तर सर्वोच्च न्यायालय चांगले, निकाल विरोधात गेला तर न्यायालय वाईट अशी काँग्रेसचे नेते व अन्य विरोधक भूमिका घेत असतात. संविधानाने तयार केलेल्या संस्थांचे पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न हे लोक कसे करतात, हे यावरून आता स्पष्ट झाले आहे, असेही फडणवीस म्हणाले
दरम्यान, माजी पर्यटन मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी बारसु प्रकल्पाबाबत बोलताना फडणवीस यांनी केवळ विरोधाला विरोध म्हणून काही तरी टीका करायची, यामध्ये तथ्य नाही. मला असं वाटलं होतं की आदित्य ठाकरे तरी किमान अभ्यास करून बोलतील मात्र त्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधून घेतली आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी केली. डोळ्यांना पट्टी बांधणाऱ्यांना उत्तर देऊन फायदा तरी काय असा प्रश्नही फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला. संभाजी भिडे यांच्य वक्तव्याबाबत मी माझ्यावतीने सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. या भूमिकेनंतर कोणाला जाबजबाब देण्याची गरज राहिलेली मला वाटत नाही, असेही ते म्हणाले.मी ‘सामना’ वाचत नाही
संभाजी भिडेंविरुद्ध सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखाविषयी विचारले असता फडणवीस यांनी ‘मी सामना वाचत नाही...’ असे सांगितले. भिडेंच्या वक्तव्याचे कदापी समर्थन करणार नाही, त्याबाबतची भूमिका स्पष्ट केलेली आहे, असेही ते म्हणाले.अधिवेशनाने जनतेला खूप काही दिलं...
राज्याच्या जनतेला अधिवेशनातून खुप काही जनतेला मिळाले. मोदी आवास योजनेसारख्या विविध योजना या अधिवेशनातून दिल्या. तसेच वेगवेगळे बिलदेखील या अधिवेशनात मंजुर करण्यात आले. यामुळे महाराष्ट्र पुढे जाणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.