हुक्का पार्टीप्रकरणी ५२ संशयितांना न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2022 12:12 AM2022-03-15T00:12:30+5:302022-03-15T00:13:35+5:30
इगतपुरी : तालुक्यातील त्रिंगलवाडी येथील माऊंटन शॅडो रिसॉर्टमध्ये शनिवारी (दि.१२) ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून रंगलेली हुक्का पार्टी उधळून लावली ...
इगतपुरी : तालुक्यातील त्रिंगलवाडी येथील माऊंटन शॅडो रिसॉर्टमध्ये शनिवारी (दि.१२) ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून रंगलेली हुक्का पार्टी उधळून लावली होती. यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ५२ पुरुष व २० महिलांना सोमवारी (दि.१४) इगतपुरी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने यातील ५२ पुरुषांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. तर देहविक्रीसाठी महिला पुरविणाऱ्या मुंबईतील दोघा महिलांना १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, देहविक्रीसाठी आणलेल्या १८ महिलांना वात्सल्य होम प्रोटेक्शनमध्ये ठेवण्याची सूचना न्यायालयाने केली.
इगतपुरी तालुक्यातील माऊंटन शॅडो रिसॉर्टमध्ये शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ग्रामीण पोलिसांनी हुक्का पार्टीवर छापा टाकत ५२ पुरुष व १८ महिलांना ताब्यात घेतले होते. रेवती कंपनीच्या हार्डवेअर स्पेअर पार्ट कंपनीतील देशातील प्रत्येक राज्यातील होलसेल डिस्ट्रिब्यूटर असलेल्या ५२ जणांना या पार्टीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. पोलिसांना या हुक्का पार्टीची भणक लागल्यानंतर त्यांनी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास छापा टाकला. यात पुरुषांसह देहविक्री करणाऱ्या १८ तरुणींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकाने ही कारवाई केली होती. संशयितांवर इगतपुरी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार कायदा व सिगारेट तंबाखू मुंबई प्रोव्हिजन ॲक्ट या कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या सर्व संशयितांना इगतपुरी पोलिसांनी सोमवारी दुपारी ३ वाजता इगतपुरी न्यायालयात हजर केले. यावेळी सरकारी वकील व संशयितांचे वकील यांच्यामध्ये सायंकाळी उशिरापर्यंत युक्तिवाद झाला. यावेळी यावेळी सरकारी वकिलांनी तीन दिवसाची पोलीस कस्टडी मागणी केली. दरम्यान, सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन हा कायदा जामीनपात्र असल्याकारणाने हे गृहित धरून तसेच दारू प्रतिबंधक केस यामध्ये पोलीस कस्टडीची गरज नाही, असा युक्तिवाद संशयितांच्या वकिलांनी केला. न्यायालयाने ५२ संशयितांना १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली, तर देहविक्रीसाठी महिला पुरविणाऱ्या दोन महिला शिल्पा सिराज कुरेशी व दीपाली देवळेकर रा. मुंबई यांना १६ मार्चपर्यंत चौकशीसाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती सरकारी वकील ॲड. अर्चना महाले यांनी दिली. उर्वरित १८ महिलांना कलम १५ प्रमाणे वात्सल्य होम प्रोटेक्शनमध्ये ठेवण्याचा आदेश देण्यात आला. या तरुणींचे नातेवाईक आल्यावर त्यांना त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. संशयित आरोपींचे जामीन अर्ज मंगळवारी (दि.१५) न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याचे संशयितांच्या वकिलांकडून सांगण्यात आले.