प्रदूषित गोदावरीत स्नान तरी कसे करावे
By admin | Published: February 9, 2015 01:46 AM2015-02-09T01:46:23+5:302015-02-09T01:47:04+5:30
प्रदूषित गोदावरीत स्नान तरी कसे करावे
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत देवेंद्र फडणवीस सरकार प्रचंड निष्क्रिय ठरले आहे. सिंहस्थ कामाचे कोणतेही नियोजन नाही असा आरोप करीत गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी एक इंचही काम झाले नसल्याचा आरोप करीत त्र्यंबकेश्वर येथील आखाड्यांच्या महंतांनी नाशिकमध्ये कुंभमेळा का घ्यावा? आणि प्रदूषित गोदावरीत स्नान तरी कसे करावे असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
सिंहस्थ कामासाठी मंजूर झालेल्या २३८० करोडमधून दहा करोडदेखील त्र्यंबकेश्वरला खर्च झाले नाहीत असा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. उत्तर प्रदेश आणि अलाहाबाद येथे भरणाऱ्या कुंभमेळ्याबाबत तेथील राज्य सरकारांकडून ज्या तत्परतेने नियोजन केले जाते तशी तत्परता महाराष्ट्र शासनामध्ये नसल्याचा आरोप अखिल भारतीय दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष सागरानंद आणि श्री निरंजनी आखाड्याचे राष्ट्रीय सचिव नरेंद्रगिरी महाराज यांनी पत्रकार परिषदेत केला.
गोदावरीची स्वच्छता आणि घाट सुशोभिकरण्याबाबत कोणतेही नियोजन राज्य शासनाने केलेले नाही. गोदावरीतील सांडपाण्यामुळे पात्र पूर्णपणे प्रदूषित झाले आहे. पाण्यात दोन-दोन इंचांपर्यंतची किडे पडले आहेत. घाण, चिखल आणि दुर्गंधीयुक्त पाण्यातच कुंभ होणार असेल, तर गोदावरीत स्नान करू नका, असे साधुंना सागावे लागेल, असा इशारा अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महंत हरिगिरी यांनी दिला.शहरातील सर्व सांडपाणी गोदावरी पात्रात सोडण्यात आले आहे. वास्तविक त्र्यंबकेश्वर ते नाशिक अशी सुमारे २० किलोमीटर स्वतंत्र सांडपाणी वाहणारी पाइपलाइन शहराबाहेर सोडण्याबाबत आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. परंतु याबाबत सरकारकडून कोणतेही उत्तर दिले जात नाही. सिंहस्थ नियोजनात त्र्यंबकेश्वरच्या कोणत्याही आखाड्याला विश्वासात घेतले जात नसल्याचाही आरोप हरिगिरी महाराज यांनी केला. कुंभमेळ्याचे पावित्र्य राखले जाणार नसेल आणि धार्मिक महत्त्व आबाधिक ठेवण्यासाठी राज्य शासनाकडून कोणतीही उपाययोजना होणार नसले तर यंदाचा कुंभमेळा केवळ म्हणजे केवळ पर्यटनच आहे का? असाही सवाल महंत हरिगिरीजी महाराज यांनी उपस्थित केला.