बिबट्याच्या जबड्यात वासराचा हंबरडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:11 AM2021-06-10T04:11:58+5:302021-06-10T04:11:58+5:30
गंगापूर - मध्यरात्रीच्या नीरव शांततेत वासराने हंबरडा फोडला आणि शेतकऱ्याला जाग आली. आवाजाच्या दिशेने त्याने धाव घेतली, तेव्हा बिबट्याच्या ...
गंगापूर - मध्यरात्रीच्या नीरव शांततेत वासराने हंबरडा फोडला आणि शेतकऱ्याला जाग आली. आवाजाच्या दिशेने त्याने धाव घेतली, तेव्हा बिबट्याच्या जबड्यात वासराने अखेरचा हंबरडा फोडल्याचे दृश्य त्यांना दिसले. डोळ्यांदेखत घडलेल्या या घटनेनंतर भेदरलेल्या शेतकऱ्याने गावकऱ्यांना हाक दिली. मात्र, तोवर बिबट्या पसार झाला होता.
नाशिक तालुक्यातील महादेवपूर गावात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अर्जुन सीताराम भागवत यांच्या शेतातील घराच्या मागील बाजूस असलेल्या गोठ्यामध्ये बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला करून ठार केले. या घटनेमुळे महादेवपूर गावासह आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे.
शेतकरी भागवत यांच्या घराच्या मागे पशुधन बांधण्यासाठी गोठा आहे. यामध्ये सर्व पशुधन बांधून रात्री झोपले असता मध्यरात्रीच्या सुमारास वासराच्या ओरडण्याचा आवाज त्यांना आला. भागवत यांनी गोठ्याकडे धाव घेतली असता त्यांना बिबट्याने वासरावर हल्ला केल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. मात्र, बिबट्या तोपर्यंत तिथून पसार झाला होता. सकाळी या घटनेची माहिती वनविभागाला समजताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी येत पंचनामा केला.
येथील मळे परिसर, शेती, झाडेझुडपे तसेच नदी असल्याने बिबट्याचा या परिसरात वावर दिसतो. अनेकांना बिबट्याने दर्शन दिले असल्याचे लोक सांगतात. या भागात अनेकदा बिबट्याने पशुधनावर हल्ला केल्याच्या घटना या परिसरात घडल्या आहेत. महादेवपूर, नाईकवाडी, साडगाव, वडगाव, लाडची, गिरणारे, दुगाव, गंगाव्हरे, गोवर्धन, मुक्त विद्यापीठ परिसर, चांदशी, जलालपूर, मनोली, मातोरी, दरी, मुंगसरा, नाशिक डावा कालव्याचे शेतमळे परिसरात बिबट्याच्या दर्शनाने नागरिक भयभीत झाले आहेत.
या भागात पिंजरा लावण्याची मागणी नितीन भागवत, साहेबराव भागवत, संजय भागवत, विकास भागवत, अजय भागवत यांनी वनविभागाकडे केली आहे. नाशिक तालुक्यातील विशेषकरून पश्चिम पट्ट्यात बिबट्याची दहशत पसरल्याचे अनेकदा समोर आले आहे.
--