मालेगावी लवकरच शंभर खाटांचे स्वतंत्र महिला रुग्णालय
By admin | Published: January 15, 2015 10:50 PM2015-01-15T22:50:59+5:302015-01-15T22:51:10+5:30
मालेगावी लवकरच शंभर खाटांचे स्वतंत्र महिला रुग्णालय
मालेगाव : राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्यासोबत मालेगावच्या आरोग्यप्रश्नासंबंधी बैठक झाली. लवकरच मालेगावात शंभर खाटांचे स्वतंत्र महिला रुग्णालय उभारणीस मान्यता मिळेल, अशी माहिती सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी पत्रकाद्वारे दिली.
आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मालेगावच्या आरोग्य समस्यांविषयी चर्चा झाली. त्यात भुसे यांनी शहर व तालुक्यातील महिलांसाठी सटाणा रस्ता येथील जुन्या इमारतीत स्वतंत्र रुग्णालयाची आवश्यकता निदर्शनास आणून दिली. तसेच सदर रुग्णालय लवकर व्हावे अशी मागणी केली. यावर आरोग्यमंत्री सावंत यांनी संचालक आरोग्य व सेवा यांना यासंबंधी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगून तसा प्रस्ताव आल्यावर त्यास शासन तात्काळ मंजुरी देईल, असे सांगितले.
डायलिसीस विभागातील वस्तूंच्या खरेदीसाठी तीन लक्ष व डिझेलसाठी एक लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या रुग्णालयातील पाच महत्त्वाची पदे त्वरित भरण्यात येतील. तसेच वर्ग दोनची पदे एक महिन्यात व वर्ग चारची पदे रोटर पद्धतीने भरण्यात येणार आहेत.
यावेळी सहकार राज्यमंत्री भुसे यांच्यासह संचालक सतीश पवार, उपसंचालक बी. डी. पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माले, डॉ. रमाकांत जाधव आदि उपस्थित होते.