नाशिक : शहरात कोरोनाचे संकट वाढत असल्याने महापालिका आता पुन्हा ॲक्शन मोडवर आली असून, त्यामुळे मास्क न वापरणाऱ्या शंभर नागरिकांनाच एकाच दिवसात दंड करण्यात आला आहे.
यासंदर्भात आयुक्त कैलास जाधव यांनी कठोर भूमिका घेण्याचे आदेश दिल्याने सर्वच यंत्रणा सक्रिय झाल्या असून, आरोग्य विभागाने स्वच्छ शहर सर्वेक्षणाचे काम काहीसे बाजूला सारून आरोग्य नियमांच्या पालनासाठी आघाडी उघडली आहे. जून ते ऑक्टोबर महिन्यांपर्यंत नाशिक शहरात कोरोनाचा कहर होता. नोव्हेंबर महिन्यात तो कमी होऊ लागल्याने जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत होते. त्यामुळे निर्बंध शिथिल केले होते.
दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याच्या चर्चा झडल्या असल्या तरी प्रत्यक्षात तशी स्थिती निर्माण झाली नाही. परंतु त्यामुळे आरोग्य नियमांचा नागरीकांना विसर पडू लागला. त्यामुळे शहरात पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी शहरात आरोग्य नियमांचे पालन न करणारे नागरिक आणि अन्य व्यक्तींच्या विरोधात कारवाई सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
बाजारपेठेत नो मास्क, नो एन्ट्रीची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यामुळे यंत्रणाही सक्रिय झाली आहे. एकाच दिवसात शंभर नागरिकांना दंड करून वीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालक डॉ. कल्पना कुटे यांनी दिली.