कवी थरथरला तर साम्राज्ये उलथली जातात : रंगनाथ पठारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:22 AM2019-03-21T00:22:04+5:302019-03-21T00:22:35+5:30
कविता सत्य तेच बोलते, त्यामुळेच कवी झाडासारखा थरथरला तरी मोठमोठी साम्राज्येही उलथली जातात.
नाशिक : कविता सत्य तेच बोलते, त्यामुळेच कवी झाडासारखा थरथरला तरी मोठमोठी साम्राज्येही उलथली जातात. सत्तेची उलथापालथ करण्याचे सामर्थ्य कवितेत असून, आणीबाणीसारख्या काळात कवींना शीर्षस्थानी यावे लागते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी केले.
पुस्तक पेठ व पॉप्युलर प्रकाशन यांच्यातर्फे कुसुमाग्रज स्मारकात कवी सौमित्र ऊर्फ किशोर कदम यांच्या ‘बाउल’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन रंगनाथ पठारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पठारे म्हणाले, आयुष्यात काही सुंदर गोष्टी येतात, तसेच काही जिवाच्याही येतात, त्यापैकी एक म्हणजे किशोर असून, तो अद्भुत नट आहे. भूमिकेत शिरणे, त्याचा भाग होणे हे त्याच्याकडून शिकण्यासारखे आहे. बाउल म्हणजे माणसाला माणूस म्हणून व्यक्त होण्याच्या कसोशीचा प्रयत्न असल्याचे रंगनाथ पठारे यांनी यावेळी अधोरेखित केले. तर कवी संजय जोशी यांनी सौमित्र, कविता व बाउल याविषयी दीर्घकविता सादर केली. पॉप्युलर प्रकाशनच्या अस्मिता मोहिते व शब्दालय प्रकाशनच्या सुमती लांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन निखिल दाते यांनी केले.
पठारे म्हणाले, ज्या समाजव्यवस्थेमध्ये कवी शीर्षस्थानी असतो ती दुनिया नीटनेटकी असते. अशा कवितेत जगणे ही सर्वांत कठीण गोष्ट आहे, खरे तर कवीने समाजामध्ये असणे ही मोलाची गोष्ट आहे. कारण त्याच्या सामर्थ्याची तुलना कुणाशीही होऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.