...तर संकटांवर मात शक्य : नमिता कोहक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 01:35 AM2019-05-15T01:35:40+5:302019-05-15T01:35:58+5:30
आयुष्याच्या वाटेवर मानसिक आणि शारीरिक अनेक संकटे येतात, पण अशाही स्थितीत व्यक्तीकडे सकारात्मक दृष्टिकोन असेल तर कोणत्याही संकटावर यशस्वीपणे मात करून नवीन यशाला गवसणी घालता येते, असे प्रतिपादन मिसेस विश्वसुंदरी डॉ. नमिता कोहक यांनी केले.
सिडको : आयुष्याच्या वाटेवर मानसिक आणि शारीरिक अनेक संकटे येतात, पण अशाही स्थितीत व्यक्तीकडे सकारात्मक दृष्टिकोन असेल तर कोणत्याही संकटावर यशस्वीपणे मात करून नवीन यशाला गवसणी घालता येते, असे प्रतिपादन मिसेस विश्वसुंदरी डॉ. नमिता कोहक यांनी केले.
सिडको येथील शिवाजी भाजी मार्केट मैदान, शॉपिंग सेंटर येथे नवे नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळ, सूर्योदय परिवार आणि लोकमान्य वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘मुकुटाचा काटेरी प्रवास’ या विषयावर पहिले पुष्प गुंफतांना कोहक बोलत होत्या.
व्याख्यानमालेचे उद्घाटन ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर माजी आमदार अपूर्व हिरे, डॉ. राहुल पाटील, सावळीराम तिदमे, देवराम सौंदाणे उपस्थित होते.
यावेळी डॉ. कोहक यांनी सांगितले, एक सर्वसामान्य स्त्री ते कर्करोगाशी लढा देऊन इंटरनॅशनल वर्ल्डवाईड क्वीन या पुरस्कारपर्यंतच थक्क करणारा प्रवास त्यांनी उलगडला. उपचारानंतर कॅन्सरवर यशस्वी मात केली पण शरीराची पूर्ण झीज झाली होती; पण मनाची नव्हे. म्हणूनच ‘मिसेस इंडिया फोटोजनिक चेहरा’ हा किताब मिळाला. या पाच दिवसांच्या स्पर्धेमुळे हरविलेली नमिता पुन्हा मिळाली, असे त्यांनी यावेळी सांगितले.
उद्घाटक ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे, माजी आमदार अपूर्व हिरे यांनीही मनोगत व्यक्त केले. व्याख्यानमालाचे अध्यक्ष किरण सोनार यांनी सूत्रसंचालन केले.
वक्त्यांचा परिचय नंदकुमार दुसानिस यांनी करून दिला. स्वागत जनार्दन माळी यांनी तर रामदास शिंपी यांनी आभार मानले.