येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘डॉक्टर्स डे’निमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. एस.के. पाटील प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे होते.
कोरोनाच्या लक्षणांमध्ये थकवा येणे, सर्दी, ताप, खोकला ही लक्षणे आहेत. कोरोनाचे निदान पहिल्या तीन-चार दिवसांत झाले व उपचार घेतले तर रुग्ण दगावत नाही. पाच दिवसांच्या वर ताप राहिला व उपचार घेतले नाहीत, तर कोरोनाचा धोका वाढतो व रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल कमी असल्यास दवाखान्यात भरती व्हावे लागते. ऑक्सिजन द्यावा लागतो व ऑक्सिजनची बाटली अशुद्ध असेल तर त्यामुळे म्युकरमायकोसिसचा धोका निर्माण होतो. अस्वच्छ मास्क वापरल्यानेही त्रास होऊ शकतो, असेही डॉ. पाटील यांनी या वेळी सांगितले. प्रास्ताविक प्रा. कैलास बच्छाव यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. शरद चव्हाण यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. मनीषा गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. धनराज धनगर यांनी केले. कार्यक्रमास डॉ. गौतम कोलते यांचे तांत्रिक साह्य लाभले. कार्यक्रमास उपप्राचार्य शिवाजी गायकवाड, पर्यवेक्षक अरुण वनारसे, वरिष्ठ लिपिक डी. एम. बागुल तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इन्फो
प्रतिबंध हाच प्रभावी उपचार
प्रतिबंध हाच प्रभावी उपचार आहे. अंडे व मांसाहार तसेच तृणधान्ये व कडधान्ये यांतून प्रोटीन्स भरपूर मिळते; त्यामुळे रोजच्या आहारात त्याचा समावेश असावा. दैनंदिन आहारात पिष्टमय पदार्थांचे प्रमाण २५ टक्क्यांपेक्षा अधिक असता कामा नये, अशी माहितीही डॉ. पाटील यांनी दिली.